देशातील सर्वसामान्यांसाठी अच्छे दिन येणार असल्याची चाहूल देणारी एक बातमी आहे. भ्रष्टाचारचा मुकाबला करण्यात भारत यशस्वी ठरत असून, त्यामुळे पारदर्शक प्रशासन असणाऱया देशांच्या यादीमध्ये भारताचे स्थान वर सरकले आहे. यादीत २०१३ मध्ये भारत ९४ व्या स्थानावर होता. यावर्षी तो ८५ स्थानांपर्यंत वर सरकला आहे. ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल इंडिया या संस्थेने केलेल्या पाहणीतून हा निष्कर्ष निघाला. यादीमध्ये पहिल्या स्थानावर डेन्मार्क आहे. त्यामुळे तेथील प्रशासन सर्वाधिक पारदर्शी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर उत्तर कोरिया आणि सोमालिया हे देश सर्वाधिक भ्रष्ट असल्याचे यादीमध्ये म्हणण्यात आले आहे.
यादीत करप्शन पर्सेप्शन इंडेक्सच्या माध्यमातून प्रत्येक देशाला गुण देण्यात आले आहेत. ज्या देशाकडे सर्वाधिक गुण आहेत, तेथील प्रशासन सर्वाधिक पारदर्शक आहे. यादीमध्ये भारताला ३८ गुण मिळालेले आहेत. गेल्यावर्षी भारताला ३६ गुण देण्यात आले होते. यंदा दोन गुण जास्त मिळाल्यामुळे यादीतील भारताचे स्थान वर सरकले आहे. भारताचा शेजारी असलेल्या चीनला यंदा ३६ गुण मिळाले आहेत. त्यामुळे यादीमध्ये चीनचा क्रमांक भारताच्या खाली १०० व्या स्थानावर आहे. पाकिस्तान १२६ व्या स्थानावर असून, बांगलादेश १४५ व्या स्थानावर तर श्रीलंका भारतासोबत ८५ व्या स्थानावर आहे.