पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या दाऊद आणि हाफिज सईद यांना पकडण्यासाठी भारतीय लष्कर सीमेपल्याड जाऊन म्यानमारप्रमाणे एखादी धडक कारवाई करू शकते. या दोघांना पकडण्यासाठी सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करेल, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी सांगितले. ते रविवारी एका वृत्तवाहिनीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राठोड यांना दाऊद इब्राहिमला पकडण्यासाठी सरकार म्यानमारप्रमाणे एखादी धडक मोहीम का राबवत नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उत्तर देताना राठोड यांनी सांगितले की, हो असे होऊ शकते. पण, अशी कारवाई झालीच तर त्याआधी उघडपणे चर्चा होणार नाही. ही कारवाई पार पडल्यानंतरही चर्चा होईल किंवा नाही याबद्दल मी निश्चितपणे सांगू शकत नाही. पाकिस्तानला शह देण्यासाठी भारताकडे फक्त कागदी पुराव्यांचाच (डोझियर) पर्याय आहे असे नाही. त्यासाठी भारताकडे अन्य पर्यायही आहेत. त्यामध्ये साम-दाम-दंड-भेद अशा सर्व मार्गांनी प्रयत्न केले जातील. भारताचा शत्रू कुठेही लपून बसला असेल तरी त्याने भारताचे त्याच्याकडे लक्ष नाही, असा गैरसमज करून घेऊ नये. या शत्रूंवर सतत नजर ठेवण्यात येत असून भारत कधीही त्यांच्याविरोधात कारवाई करू शकतो, असा इशारा राठोड यांनी दिला.