जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणुचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मागील चोवीस तासांत देशभरात २४ हजार ८५० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, ६१३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोना रुग्ण संख्या वाढीतील हा आतापर्यंतचा उच्चांक मानला जात आहे. यामुळे देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ७३ हजार १६५ वर पोहचली आहे.

देशभरातील तब्बल ६ लाख ७३ हजार १६५ करोनाबाधितांमध्ये सध्या उपचार सुरू असलेले २ लाख ४४ हजार ८१४ जण, उपाचारानंतर रुग्णालायतून सुट्टी देण्यात आलेले ४ लाख ९ हजार ८३ जण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १९ हजार २६८ जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे.

देशभरात ४ जुलै पर्यंत तब्बल ९७ लाख ८९ हजार ६६ नमूने तपासण्यात आले आहेत. यातील २ लाख ४८ हजार ९३४ नमुण्याची तपासणी काल झाली आहे. आयसीएमआरने ही माहिती दिली आहे.

करोना अर्थात कोविड १९ वर भारतात निर्माण केलेली लस स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर जारी करण्याच्या सरकारच्या खटाटोपावर देशातील वैज्ञानिकांनी धोक्याचा इशारा दिला आहे. आयसीएमआरने पुढील महिन्यात करोनावरची स्वदेशी लस स्वातंत्र्य दिनापर्यंत तयार झालीच पाहिजे, असे फर्मान संबंधित औषध कंपन्या, रुग्णालये व वैज्ञानिक संस्था यांना सोडल्याने त्यावर टीका करण्यात आली आहे.

वैज्ञानिकांनी याबाबत म्हटले आहे की, लशीची खूप निकड असली, तरी ती तयार करण्यासाठी अनेक महिने लागत असताना दोन महिन्यांच्या कालावधीत ती तयार करायला सांगणे, यात कुठलाच समतोल दिसत नाही. आयसीएमआर म्हणजे भारतीय वैद्यक संशोधन संस्थेने लस स्वातंत्र्य दिनापर्यंत आणण्याची केलेली घोषणा आशादायी असली तरी त्यात धोकाही आहे.

देशी बनावटीच्या संभाव्य करोना लशीच्या सार्वजनिक वापरासाठी ‘अंतिम तारीख’ ठरवण्याच्या केंद्र सरकारच्या खटाटोपावर टीका झाल्यानंतर, शनिवारी भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आयसीएमआर आपण देशवासीयांची सुरक्षितता आणि हिताच्या रक्षणाला सर्वाधिक प्राधान्य देण्यास कटिबद्ध असल्याचे स्पष्टीकरण दिले.

लस विकसित करण्याची प्रक्रिया अधिक वेगाने करण्याचा निर्णय जागतिक मान्यताप्राप्त नियमांनुसारच घेण्यात आला आहे. लशीची मानवी चाचणी व प्राण्यांवरील चाचणी या एकाच वेळी केल्या जाऊ शकतात, असे समर्थन ‘आयसीएमआर’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात केले आहे.