संजीव कपूर, बाबा रामदेव यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रम

देशाच्या राजधानीमध्ये आयोजित केलेल्या जागतिक भारतीय अन्न २०१७ महोत्सवात शनिवारी तब्बल ९१८ किलोची खिचडी बनवून गिनेस बुकमध्ये विक्रम नोंदविण्यात आला आहे. प्रसिद्ध आचारी संजीव कपूर, अक्षय पात्र सामाजिक संस्था आणि योगगुरू रामदेव बाबांच्या मार्गदर्शनाखाली ५० जणांच्या चमूने ही खिचडी बनविली.

इंडिया गेटजवळ तीन दिवसीय जागतिक भारतीय अन्न २०१७ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त खिचडीला राष्ट्रीय थाळीचा दर्जा दिल्याची अफवा समाजमाध्यमांवरून पसरली होती. मात्र, या खिचडीने थेट गिनेस बुकमध्ये आपले नाव कोरले आहे. ८०० किलोची खिचडी बनविण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून नियोजन आणि रंगीत तालीम सुरू होती.

शनिवारी सुरुवातीला १२०० किलोची खिचडी बनविण्याचा दावा करण्यात आला. मात्र, खिचडीसाठी वापरलेल्या भल्यामोठय़ा कढईचेच वजन ३४३ किलो होते. यानुसार तांदूळ, डाळ आणि भाजीपाला यांच्या वापरातून ९१८ किलो खिचडी बनविण्यात आल्याचे गिनेस बुकचे अधिकारी पाउलिना सपिंस्का यांनी स्पष्ट केले.

खिचडी हे अन्न आरोग्याला पोषक आहे. याच्यातून शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात. खिचडीला भारतीय अन्नाचा दर्जा देणे ही खूप चांगली गोष्ट आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खिचडीचा प्रसार होण्यास मदत मिळेल, असे बाबा रामदेव यांनी सांगितले.

अनाथालय, गुरुद्वारांमध्ये वाटप

महोत्सवामध्ये बनविण्यात आलेली खिचडी अक्षय पात्र संस्थेच्या अनाथालयांमध्ये आणि गुरुद्वारांमध्ये जवळपास ६० हजार लोकांना वाटण्यात आली.