संरक्षण प्रणालीमुळे चूक घडल्याच्या शक्यतेबाबत चौकशी

भारताने पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानात घुसून बालाकोट कारवाई केल्यानंतर २७ फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्या लढाऊ विमानांमध्ये पाठलाग सुरू असताना श्रीनगरनजीक भारताचे ‘एमआय १७’ हेलिकॉप्टर कोसळले होते, पण भारतीय हवाई संरक्षण प्रणालीतील चुकीमुळे ते अनवधानाने पाडले गेल्याच्या शक्यतेबाबत चौकशी सुरू आहे.

भारतीय हवाई दलाचे एमआय १७ हेलिकॉप्टर आकाशात होते तेव्हा त्यात ते शत्रूचे की आपले हे दर्शवणारी यंत्रणा सुरू करण्यात आली नसावी.  या प्रणालीतून ते रडारवर दिसले तेव्हा ते शत्रूचे आहे की आपले हे कळण्याचा कुठलाही मार्ग नसावा, असे काही अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, हे हेलिकॉप्टर  भारताकडूनच पाडले गेल्याच्या शक्यतेवर मात्र हवाई दलाने काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

‘कुठल्याही हवाई अपघातात जेव्हा ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ नेमली जाते तेव्हा सर्व शक्यतांचा विचार करून निष्कर्ष काढला जातो. एमआय १७ हेलिकॉप्टरच्या प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीच्या अनुषंगाने सर्व शक्यतांचा विचार केला जात आहे. त्यामुळे याबाबत सध्या काही प्रतिक्रिया देणे अयोग्य आहे.’  – प्रवक्ता, भारतीय हवाई दल