परदेशात ठेवण्यात आलेला काळा पैसा आम्ही सत्तेवर आणल्यावर भारतात आणू आणि प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू, असे आश्वासन देणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांच्या खात्यात केवळ एक रुपया जमा केला असल्याची टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी मंगळवारी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी जनधन योजनेची बॅंक खाती कशा पद्धतीने सांभाळली जात आहेत, याची एक नवीच माहिती ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने केलेल्या तपासातून पुढे आली आहे. शून्य शिल्लक (झिरो बॅलन्स) खात्यांची संख्या कमी दाखविण्यासाठी जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या अनेक खात्यांमध्ये संबंधित बॅंक कर्मचारी स्वतःच एक रुपया जमा करीत असल्याची माहिती समोर आली आहे. जनधन योजनेची आणि स्वतःची ‘कार्यक्षमता’ दाखवण्यासाठी अशा पद्धतीने पैसे जनधन योजनेकडे वळविण्यात येत असल्याचे तपासात दिसून आले. 30 पेक्षा जास्त राष्ट्रीयकृत बँका आणि प्रादेशिक बँकांकडून माहिती अधिकार कायद्यांतर्गत सुमारे 25 गावांतील लोकांची बॅंक खाती या तपासात तपासण्यात आली. शून्य शिल्लक खाते म्हणजे कोणताही ग्राहक ते खाते वापरतच नाही, असा अर्थ होतो आणि त्यामुळे जनधन योजनेचीच बदनामी होते. त्यामुळे या खात्यात काहीतरी व्यवहार झाला पाहिजे, असा दबाव आमच्यावर टाकण्यात आला. त्यातूनच मग आम्ही बॅंक कार्यालयाच्या देखभालीसाठी राखीव ठेवलेल्या निधीतून काही रक्कम या खात्यांकडे वळवली, असे विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या व्यवस्थापकांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले आहे. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सीताराम येचुरी यांनी मोदी सरकारवर टीका केली.
‘जनधन’चे वास्तव : ‘कार्यक्षमते’साठी बँक कर्मचारीच स्वतःच्या खिशातून भरताहेत पैसे!
ते म्हणाले, जनधन योजने अंतर्गत काढण्यात आलेल्या एकूण खात्यांपैकी ७५ टक्के खात्यांवर डिसेंबर २०१४ मध्ये झिरो बॅलन्स होता. सरकारने आपल्या योजनेचे अपयश लपविण्यासाठी बँकांना या खात्यांमध्ये एक रुपया जमा करण्याच्या सूचना केल्या आहेत. सरकारच्या सर्व योजना केवळ जनसंपर्क आहे का आणि सर्व आर्थिक माहिती केवळ जुमला आहे का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.