पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यावर सॅम पित्रोदा यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. सॅम पित्रोदा हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय असून इंडिअन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख आहेत. भारताच्या हवाई हल्ल्यात खरंच ३०० दहशतवाद्यांचा मृत्यू झाला का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला असून पित्रोदा यांच्या या विधानांमुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत.

पुलवामा येथील हल्ला आणि त्यानंतर भारताने पाकमधील दहशतवादी तळांवर केलेले एअर स्टाइक या पार्श्वभूमीवर सॅम पित्रोदा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पित्रोदा म्हणाले, भारताच्या या हवाई हल्ल्याबाबत मी न्यूयॉर्क टाइम्स आणि इतर वर्तमानपत्रांमध्ये वाचले. त्यानुसार, भारताने खरंच असा हल्ला केला का? आपण खरंच ३०० दहशतवादी मारले? जर तुम्ही म्हणता की ३०० दहशतवादी मारले, तर सर्व भारतीयांना याचा पुरावा मिळायला हवा. कारण, या हल्ल्यात कोणीही ठार झालेले नाही असं आंतरराष्ट्रीय माध्यमे म्हणत आहेत. त्यामुळे भारतीय नागरिक म्हणून मला याचे वाईट वाटते, असे त्यांनी सांगितले.


काही लोकांमुळे संपूर्ण पाकिस्तानला दोषी ठरवता येणार नाही, पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकवर केलेल्या कारवाईची पद्धतही चुकीची होती, असे मतही पित्रोदा यांनी व्यक्त केले आहे. भारतावर अशा प्रकारचे हल्ले यापूर्वीही झाले आहेत. मुंबईतही असाच हल्ला झाला होता, तेव्हा देखील आपण विमाने पाठवू शकलो असतो. पण मला ही भूमिका पटत नाही, असे पित्रोदा यांनी सांगितले.


मुंबई हल्ल्यावेळी आठ लोक इथे आले आणि त्यांनी हल्ला केला. मात्र, यामुळे तुम्ही पाकिस्तानातील सर्व नागरिकांना दोषी ठरवू शकत नाही, पण हीच गोष्ट आपण स्वीकारत नाही, असेही सॅम पित्रोदा यांनी सांगितले आहे.

भाजपाचे लोक सांगतात की, पंतप्रधान मोदी हे मजबूत सरकारचे प्रतिक आहेत. मात्र, भारताला आता ठरवायला हवे की, लोकशाहीच्या भल्यासाठी मजबूत सरकार असणं गरजेचं नाही. हिटलरही खूपच मजबूत होता. जगातील सर्व हुकुमशहा मजबूत होते. चीनचे पंतप्रधानही मजबूत आहेत. हेच भारतालाही हवंय का? असेही पित्रोदा यांनी म्हटले आहे.