ब्रिटनच्या खासदारांनी नुकताच सीरियावर हवाई हल्ले करण्याच्या बाजूने कौल दिल्यानंतर, इस्लामिक स्टेट दहशतवादी गटाने त्या देशात आत्मघातकी बाँबहल्ले घडवून आणण्याची धमकी दिली आहे.
‘आमचा बदला सुरू झाला असून आता रक्तपात होईल. याची सुरुवात फ्रान्सपासून होईल’, असा इशारा आयसिसने ज्या दिवशी खासदारांनी हवाई हल्ल्यांना मान्यता दिली त्याच दिवशी, म्हणजे बुधवारी जारी केलेल्या एका प्रचाराच्या व्हिडीओमध्ये दिला आहे.
या व्हिडीओमध्ये हातात एके-४७ रायफल घेतलेला आणि स्फोटकांचा पट्टा बांधलेला एक लढवय्या १३० जणांचा बळी घेणाऱ्या पॅरिस हल्लेखोरांचे ‘फ्रान्सच्या राजधानीला ध्वस्त करणारे हौतात्म्य पत्करणारे सिंह’ अशा शब्दांत कौतुक करत आहे. सीरिया व इराकमधील आयसिसविरोधी आघाडय़ांच्या सदस्यांनी माघार घ्यावी, अन्यथा आमच्या बंदुका, आमच्या गोळ्या व आमची स्फोटके यापासून त्यांना या जगात कुठेही सुरक्षा मिळणार नाही, असे हा इसम इंग्रजीत सांगतो आहे.