मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे निकटवर्तीय अश्विन शर्मा यांच्या घरावर रविवारी आयकर विभागाने छापे टाकल्यानंतर सीआरपीएफ आणि मध्य प्रदेश पोलिसांमध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी सीआरपीएफवर स्थानिक लोकांना त्रास दिल्याचा आरोप केला आहे. तर आयकर विभागावर अश्विन शर्मा यांना बळजबरीने दिल्लीला नेल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

अश्विन शर्मा हे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे ओएसडी प्रवीण कक्कड यांचे सहकारी आहेत. त्यांच्या घरी झालेल्या बाचाबाचीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यांच्या निकटवर्तीयांच्या ५० हून अधिक ठिकाणांवर छापे मारण्यात आले आहेत. सीआरपीएफ आणि पोलिसांनी एकमेकांवर धक्काबुक्कीचा आरोप केला आहे.

भोपाळ शहर पोलीस अधिक्षक भुपिंदर सिंग म्हणाले की, ‘आमचे आयकर विभागाशी काही देणेघेणे नाही. हा निवासी परिसर आहे. आतील लोकांना वैद्यकीय मदतीची गरज आहे. स्थानिक एसएचओंना ते मदतीसाठी फोन करत आहेत. छापेमारीमुळे संपूर्ण कॉम्प्लेक्सला सीआरपीएफने घेरले आहे.’

दुसरीकडे सीआरपीएफचे अधिकारी प्रदीप कुमार म्हणाले की, ‘मध्य प्रदेश पोलीस आम्हाला आमचे काम करु देत नाहीये. त्यांनी अभ्रद भाषेचा उपयोग केला. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे आम्ही पालन करत आहोत. कोणालाही आत प्रवेश देण्यास आम्हाला मनाई करण्यात आली आहे. कारवाई सुरू असून आम्ही आमचे कर्तव्य निभावत आहोत.’