जम्मू- काश्मीरमधील चकमकीविरोधात सोमवारी स्थानिकांनी केलेल्या दगडफेकीत एका पर्यटकाचा मृत्यू झाला. थिरुमनी (वय २१) असे पर्यटकाचे नाव असून तो चेन्नईचा रहिवासी आहे.

हिज्बुल मुजाहिद्दीनच्या पाच दहशतवाद्यांना रविवारी सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले होते. यात हिज्बुलचा कमांडर सद्दाम पद्दर, काश्मीर विद्यापीठाचा सहाय्यक प्राध्यापक महंमद रफी भटसह तिघांचा समावेश होता. शनिवारी देखील चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. लागोपाठ दोन चकमकीनंतर शोपियाँ, पुलवामा या भागांमध्ये स्थानिक रस्त्यावर उतरले.

सोमवारी फुटिरतावाद्यांनी बंदची हाक दिली होती. श्रीनगर- गुलमर्ग मार्गावर निदर्शकांनी पर्यटकांच्या गाड्यांना लक्ष्य केले. दोन ते तीन गाड्यांवर निदर्शकांनी दगडफेक केली. या दगडफेकीत चेन्नईतून आलेला थिरुमनी गंभीर जखमी झाला. त्याला स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. थिरुमनी ज्या बसमध्ये होता, त्यामध्ये एकूण ४० जण होते. ते सर्व जण गुलमर्गमधील एका रिसोर्टमध्ये जात होते.पर्यटकाच्या मृत्यूचे वृत्त समजताच जम्मू- काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी मृत तरुणाच्या कुटुंबीयांची रुग्णालयात भेट घेत त्यांचे सांत्वन केले.