अनेक प्रकल्पांचे परवाने पर्यावरणाच्या नावाखाली रोखल्याच्या तक्रारी आल्याने राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याचा माजी पर्यावरण व वनमंत्री जयंती नटराजन यांनी इन्कार केला असून, कुठलेही प्रकल्प आपण अडवून ठेवले नाहीत असे स्पष्ट केले. नटराजन यांनी शनिवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी पक्षसंघटनेत कार्य करण्यासाठी आपण मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याची स्पष्टोक्ती नटराजन यांनी केली. आपण पंतप्रधानांना राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली. नटराजन यांचा राजीनामा पक्षकार्यात जाण्यासाठी, की उद्योजकांच्या दबावामुळे याची चर्चा सुरू आहे. पर्यावरण परवाने देण्यात दिरंगाई होत आहे असे मत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी फिक्कीच्या बैठकीत व्यक्त केले होते. त्यामुळे नटराजन यांच्या अचानक राजीनाम्याने चर्चा सुरू झाली. नटराजन म्हणाल्या, की आपण कुठलेही प्रकल्प रोखले नाहीत. शंभर टक्के पक्षकार्य करता यावे यासाठी आपण मंत्रिपद सोडले, पंतप्रधानांनी आपल्या कामाचे कौतुकही केले होते, पण आपणच त्यांना राजीनामा स्वीकारण्यास सांगितले. उत्तराखंडमधील जलविद्युत प्रकल्पांबाबत आपण जरूर काही प्रमाणात विरोधात होतो हे मात्र आपण मान्य करतो असे त्या म्हणाल्या.
मी कुठलेही प्रकल्प रोखले नाहीत. शंभर टक्के पक्षकार्य करता यावे यासाठी मंत्रिपद सोडले., पंतप्रधानांनी माझ्या कामाचे कौतुकही केले होते. उत्तराखंडातील जालविद्युत प्रकल्पांना मात्र मी काही प्रमाणात विरोध केला होता.    – जयंती नटराजन