केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी हॉलमार्क अनिवार्य केलं आहे. केंद्र सरकार यासंबंधी आदेश जारी करणार आहे. यासाठी सोने व्यापाऱ्यांना एक वर्षांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे १५ जानेवारी २०२१ पासून फक्त हॉलमार्क असलेल्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री करता येणार आहे. तसंच व्यापाऱ्यांना केवळ १४, १८ आणि २२ कॅरेटच्या दागिन्यांचा हॉलमार्क असलेल्या वस्तू विकता येणार आहेत. या नियमाचं उल्लंघन केल्यास एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. यासोबत दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे.

केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ पासून हॉलमार्क शिवाय सोन्याच्या दागिन्यांची विक्री होऊ शकणार नाही. सोने व्यापाऱ्यांना जुने दागिने विकण्यासाठी एक वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे. यादरम्यान सर्व व्यापाऱ्यांना नोंदणी करावी लागणार आहे.

हॉलमार्किंगमुळे फसवणूक होणार नाही
हॉलमार्क बंधनकारक केल्यानंतर फसवणुकीला आळा घालण्यात मदत होईल असं रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे. अनेक सोने व्यापारी ९ कॅरेटचा दागिना विकून २२ कॅरेटचे पैसे वसूल करतात. हॉलमार्क अनिवार्य केल्यानंतर फक्त १४, १८ आणि २२ कॅरेटच्या दागिन्यांची विक्री करण्याची परवानगी मिळणार आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. तसंच जर कोणी सोने विक्रेता किंवा हॉलमार्क केंद्राने फसवणूक केली तर त्यांना एक लाख किंवा एकूण दागिन्यांच्या पाच पट दंड ठोठावला जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.

सर्व शहरात हॉलमार्किंग केंद्र उभारणार
हॉलमार्किंगसाठी सरकार सर्व शहरांमध्ये हॉलमार्किंग केंद्र सुरु करण्याची तयारी करत आहे. आतापर्यंत फक्त २३४ शहरांमध्ये ही केंद्रं आहेत. लोक एक ठराविक फी भरुन दागिन्यांची तपासणी करुन घेऊ शकतात असं रामविलास पासवान यांनी सांगितलं आहे.

ज्या लोकांकडे जुने दागिने आहे त्यांचं काय…त्यांनाही हॉलमार्किंग बंधनकारक असणार का ? असं विचारलं असता रामविलास पासवान यांनी सांगितलं की, हा नियम फक्त सोने व्यापाऱ्यांसाठी आहे. सामान्य नागरिक आपले दागिने हॉलमार्कच्या दागिन्यांसोबत बदलू शकतात. देशात जवळपास चार लाख सोने व्यापारी आहेत. आतापर्यंत २८ हजार ८४९ जणांनी नोंदणी केली आहे.

हॉलमार्क म्हणजे काय ?

हॉलमार्क म्हणजे एका प्रकारे शुद्धतेचं प्रमाण आहे. सोने, चांदी तसंच महागड्या वस्तुंवर हॉलमार्कचं चिन्ह असतं. दागिन्यांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी हॉलमार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. ही अत्यंत जुनी पद्धत आहे. प्रत्येक देशात हॉलमार्किंगची वेगळी पद्धत आहे.
सोन्याच्या शुद्धीकरणासाठी हॉलमार्कचे चिन्ह पाहणं गरजेचं आहे. एजन्सी ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड ही तपासणी करते. कोणत्याही प्रकारच्या दागिन्यांची विक्री करण्यापूर्वी या एजन्सीकडून तपासणी करून घेणे अनिवार्य असते. त्यानंतर त्यावर हॉलमार्क दिला जातो. मात्र काही विक्रेते हॉलमार्कचे खोटे चिन्हही वापरतात. त्यामुळे हॉलमार्क खरा आहे की नाही तेही तपासून घेणे गरजेचे आहे. खऱ्या हॉलमार्कवर भारतीय मानक ब्यूरोचे त्रिकोणी चिन्ह असते. त्यात हॉलमार्किंग सेंटरसह सोन्याची शुद्धताही आणि ज्वेलरी तयार केल्याचे वर्ष तसेच उत्पादकाचा लोगोही असतो. हे सगळे आहे की नाही योग्य पद्धतीने तपासून घ्यायला हवे.