दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यालय (जेएनयू) परिसरात रविवारी (5 जानेवारी) सायंकाळी काही अज्ञात लोकांनी घूसून हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यांनी अचानकपणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आईशी घोष या गंभीर जखमी झाल्या. तर, अनेक विद्यार्थी आणि शिक्षकही जखमी झालेत. ‘अभाविप’कडून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. मुंबईमध्ये गेट वे ऑफ इंडिया येथे मुंबईतील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जेएनयूतील हल्ल्याचा निषेध करत हल्लेखोरांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, यावर राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली असून हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे.

“निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला चिंताजनक आहे. जामिया असो किंवा जेएनयू…विद्यार्थ्यांवर क्रूर बळाचा वापर केला जाऊ नये… त्या गुंडांवर तातडीने कारवाई व्हायला पाहिजे” अशा आशयाचं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. यापूर्वी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जेएनयूमधील हल्ल्याचा निषेध केला. ‘जेएनयूमध्ये गुंडांनी विद्यार्थी आणि शिक्षकांवर केलेला हल्ला स्तब्ध करणारा आहे. या हल्ल्यात अनेक विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले. देशावर राज्य करणारे फॅसिस्ट धाडसी विद्यार्थ्यांना घाबरतायेत. जेएनयूमधील हिंसेने त्यांची भीती स्पष्ट दिसते.’अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर, परराष्ट्र मंत्री एस. शिवशंकर यांनी देखील या घटनेचा निषेध केला. “जेएनयूमधील हल्ल्याची छायाचित्रे पाहिली. या हिंसेचा स्पष्टपणे निषेध करतो. ही घटना जेएनयूच्या परंपरेच्या आणि संस्कृतीच्या विरोधातील आहे.”असं ते म्हणाले. याशिवाय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही जेएनयूतील घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.


दरम्यान, मुंबईत आज सायंकाळी चार वाजता हुतात्मा चौकात या हल्ल्याचा संशय असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत. ‘जॉइंट अॅक्शन कमिटी फॉर सोशल जस्टिस’च्या नेतृत्वाखाली ही निदर्शने होणार आहेत. पुण्यातही आज सायंकाळी सात वाजता गुडलक चौकात निषेध सभा होणार आहेत. न्या. बी. जी. कोळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही सभा होणार आहे.