पत्रकार तरुण तेजपाल यांनी सहकारी महिलेवर  लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी गोव्याचे सत्र न्यायालय १९ मे रोजी निकाल जाहीर करणार आहे.

तरुण तेजपाल हे तेहलकाचे प्रमुख संपादक होते. बुधवारी ते न्यायालयात उपस्थित होते. २०१३ मध्ये गोवा येथील एका आलिशान हॉटेलमध्ये लिफ्टने (उद्वाहक) जात असताना सहकारी महिलेवर त्यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश या प्रकरणी २७ एप्रिलला निकाल देणार होते, पण न्या. क्षमा जोशी यांनी नंतर १९ मे रोजी निकाल जाहीर केला जाईल असे सांगितले.

बुधवारी न्यायालयाने सांगितले, की करोना साथीच्या कारणास्तव कर्मचारी नसल्याने निकाल पुढे ढकलण्यात येत आहे. सरकारी वकील फ्रान्सिस्को तवोरा यांनी सांगितले, की न्यायालयात सध्या १५ टक्के कर्मचाऱ्यांवर काम चालू आहे. निकाल देण्यापूर्वी कागदपत्रांबाबतचे अनेक सोपस्कार बाकी आहेत, ते कमी मनुष्यबळात शक्य नाहीत. तेजपाल हे त्यांच्या कुटुंबीयांतील काही सदस्यांसमवेत न्यायालयात उपस्थित होते. न्यायाधीशांनी निकाल तहकूब केल्यानंतर तेजपाल यांनी पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला.

प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आपण काही बोलू शकत नाही असे ते म्हणाले. गोवा पोलिसांनी लैंगिक अत्याचार प्रकरणी तेजपाल यांच्यावर नोव्हेंबर २०१३ मध्ये गुन्हा दाखल केला होता, त्या वेळी त्यांना अटक करण्यात आली. मे २०१४ पासून त्यांना जामिनावर सोडण्यात आले होते. गोव्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेने त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. यापूर्वी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आरोपपत्र निश्चिात करण्यास स्थगिती मागितली होती. पण ती याचिका फेटाळण्यात आली होती.