मध्य प्रदेशातील सत्तापालट होऊन १०० दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. गुरूवारी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारही झाला. त्यानंतर भाजपानं मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. भाजपाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.

अनेक बैठका आणि वाटाघाटीनंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमडळांचा विस्तार झाला. त्यानंतर भाजपानं माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते कमलनाथ यांच्याविरोधात हल्लोबोल केला आहे. पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे तर सध्या भाजपात असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर प्रथमच कमलनाथ यांच्यावर टीका केली होती. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी कमलनाथ यांना लक्ष्य केलं आहे.

आणखी वाचा- ज्योतिरादित्य शिंदे यांच्या ‘टायगर अभी जिंदा है’ला दिग्विजय सिंग यांचं प्रत्युत्तर; सांगितला वाघाच्या शिकारीचा किस्सा

“करोनाविरुद्धची लढाई लढण्यासाठी कमलनाथ सक्षम होते का? मध्य प्रदेशसाठी ते स्वतःच करोनापेक्षा मोठी समस्या आहेत. आम्ही या संकटाविरूद्ध चांगली लढाई केली आहे,” अशा शब्दात शिवराज सिंह चौहान यांनी कमलनाथ यांच्यावर टीका केली.

काय म्हणाले होते ज्योतिरादित्य शिंदे?

मध्य प्रदेश सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर बोलताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री कमलनाथ व काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांना काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच उत्तर दिलं होतं. “मला कमलनाथ वा दिग्विजय सिंग यांच्याकडून कोणतंही प्रमाणपत्र नकोय. त्यांनी १५ महिन्यांच्या काळात राज्याला लूटलं आहे. त्यांनी सगळ काही स्वतःसाठी केलं. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, टायगर अभी जिंदा है,” असं ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले होते.