कर्नाटकमध्ये बहुमत सिद्ध करण्यात असमर्थ राहिल्याने बीएस येडियुरप्पा यांनी अवघ्या 60 तासांमध्येच मुख्मंत्रीपदाचा राजीनामा दिला. येडियुरप्पा यांच्या नाट्यमय राजीनाम्यावरुन आता प्रसीद्ध अभिनेता प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. दोन दिवस सुरू असलेल्या कर्नाटकाच्या राजकारणावरुन त्यांनी मोदींवर आणि भाजपावर टीका केली आहे.

‘कर्नाटक भगवा होणार नाही, हे विविध रंगांचं राज्यच राहिल….खेळ सुरू होण्याआधीच संपला…56 इंच विसरा, 55 तासही कर्नाटक सांभाळता आलं नाही. प्रिय नागरिकांनो आता आणखी घाण राजकारण सुरू होईल, तुम्ही तयार राहा…’असं ट्विट करुन प्रकाश राज यांनी भाजपा आणि मोदींवर निशाणा साधला आहे.

कर्नाटकमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही, आणि येथे त्रिशंकु स्थिती राहिली. २२२ जागांपैकी भाजपा १०४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र, सरकार बनवण्यासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने बीएस येडियुरप्पा यांनी बहुमत चाचणीआधीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. बहुमत सिद्ध करण्यासाठी १११ आमदारांचा पाठिंबा आवश्यक होता. पण भाजपाकडे १०४ आमदार होते. बहुमतासाठी बरेच प्रयत्न करुनही सात आमदारांचा पाठिंबा जमवणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर येडियुरप्पांनी बहुमत चाचणीलासामोरे जाण्याआधी राजीनामा दिला. काँग्रेसने ७८ आणि जनता दल सेक्यूलर या पक्षाने ३७ जागा जिंकल्या आहेत. या दोन्ही पक्षांनी निवडणुकोत्तर युती केली आहे. त्यामुळे आता कुमारस्वामी हे कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री बनणार आहेत. कुमारस्वामी बुधवारी २३ मे रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. जनता दल सेक्युलरचे राष्ट्रीय सचिव दानिश अली यांनी ही माहिती दिली.