जगातील अग्रगण्य आकाश संशोधन संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेतील ‘नासा’ने रविवारी केरळ किनारपट्टीचे पूर येऊन गेल्यानंतरचे काही फोटो प्रकाशित केले. या फोटोंवरून पुरामुळे केरळमध्ये किती मोठ्या प्रमाणात भौगोलिक बदल झाले आहेत याचा अंदाज येतो. हे फोटो पाहून पुराची दाहकता किती होती याचाही कल्पना करता येईल.

केरळ किनारपट्टी भागात असणाऱ्या वेंबनाड तलाव क्षेत्राबरोबरच अलापूझास, कोट्टीयम, चेंगनेस्सरी आणि तिरुवेल्ला या प्रदेशातील सॅटेलाइटवरून टिपण्यात आलेल्या ग्राफिक्स इमेज ‘नासा’ने प्रकाशित केल्या आहेत. ‘नासा’ने प्रकाशित केलेल्या फोटोंमध्ये पहिला फोटो ६ फेब्रुवारी २०१८ चा आहे. हा फोटो ऑप्रेशनल लॅण्ड इमेजर तंत्रज्ञानाच्या मदतीने लॅण्डसॅट ८ या सॅटेलाइटने काढला असून यामध्ये पूराआधी केरळ किनारपट्टीचा भाग दिसत आहे. तर दुसरा फोटो हा २२ ऑगस्ट रोजी युरोपीयन स्पेस एजन्सीच्या सेन्टीनेल-२ या सॅटेलाइटने काढलेला आहे. या फोटोमध्ये अतीवृष्टी झाल्यानंतर केरळमधील किनारपट्टीच्या भागावर झालेला परिणाम दिसत आहे. या फोटोत आधीच्या फोटोत दिसणारा जमिनीचा बराचसा भाग सध्या पाण्याखाली असलेला दिसत आहे. किनारपट्टी भागातील बराचसा गवताळ प्रदेश या पुरानंतर पाण्याखाली गेल्याचे या फोटोमध्ये दिसून येत आहे.

^ ६ फेब्रुवारी २०१८ रोजी काढलेला फोटो

^ २२ ऑगस्ट २०१८ रोजी काढलेला फोटो

केरळमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराचे पाणी हळूहळू कमी होत आहे. सामान्य जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. या पुरामध्ये ४४५ जणांना आपले प्राण गमावावे लागले असून हजारो कोटींच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सध्या केरळमधील पूरग्रस्तांना खाद्यपदार्थ, औषधे आणि इतर गोष्टींची गरज असून अनेक सेवाभावी संस्था आणि सरकारी यंत्रणा या कामात गुंतल्या आहेत.