मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकिउर रेहमान लख्वी याला अपहरणाच्या खटल्यात पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अपहरणाच्या आरोपावरून केलेल्या अटकेला लख्वी याने पाकिस्तान न्यायालयात आव्हान दिले आहे.
जिल्हा आणि सत्र न्यायालयात लख्वीने याचिका दाखल केली आहे. आपल्याला खोटय़ा खटल्यात गुंतवण्यात आल्याचे त्याने याचिकेत म्हटले आहे. लख्वी याचा वकील राजा रिझवान अब्बासी यांनी लख्वी याच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली. माझ्या अशिलास तुरुंगात डांबण्यासाठी अपहरणाचे ‘भूत’ तयार करण्यात आले आहे, असे सांगतानाच पाकिस्तान सरकारने हे सारे भारताच्या दबावाखाली येऊन केल्याचा आरोप अब्बासी यांनी याचिकेत केला आहे.
मंगळवारी लख्वीची तुरुंगातून सुटका होण्याच्या काही तास आधी त्याला अपहरणाच्या आरोपांखाली पुन्हा अटक करण्यात आली. मोहम्मद अन्वर खान असे अपहरण करण्यात आलेल्या नागरिकाचे नाव असून तो अफगाणिस्तानचा नागरिक आहे.
सहा वर्षांपूर्वी लख्वीने आपले अपहरण केले होते, असे खान याने सोमवारी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. लख्वीची तत्काळ सुटका होईल की नाही, हे सांगणे या घडीला तरी अशक्य आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांनी लख्वीची अटक आणखी दोन दिवसांनी वाढवली आहे.
५४ वर्षीय लख्वीला १८ डिसेंबर रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने मुंबई हल्ला खटल्यात जामीन मंजूर केला होता. देशातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी लख्वी याला अटक करण्यात आली होती. या अटकेला लख्वीने न्यायालयात आव्हान दिले. त्यामुळे पाकिस्तान सरकारला भारताचा मोठा रोष ओढवून घ्यावा लागला होता.
सध्या लख्वी याला शालिमार पोलीस ठाण्यात कडकोट बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. अपहरण खटल्यात त्याला गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले जाईल. अधिक तपासासाठी त्याला आणखी काही दिवस कोठडीत ठेवण्यात येईल, असे पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ‘पीटीआय’ला सांगितले. किमान एक आठवडा तरी तो कोठडीत राहील, असे एक अधिकारी म्हणाला.