राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. लालूंचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांच्या विवाहाची चर्चा सुरु आहे. राष्ट्रीय जनता दलाचे आमदार आणि बिहारचे माजी वाहतूक मंत्री चंद्रिका राय यांची मोठी मुलगी ऐश्वर्याबरोबर तेज प्रताप विवाहबद्ध होऊ शकतो.

चंद्रिका राय हे बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा प्रसाद राय यांचे सुपूत्र आहेत. पाटण्यातील मौर्य हॉटेलमध्ये १८ एप्रिलला तेज प्रताप आणि ऐश्वर्या यांचा साखरपुडा होणार असल्याची माहिती आहे. १२ मे ला विवाह ठरल्याची सूत्रांची माहिती आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. चंद्रिका राय यांचे वडिल बिहारचे मुख्यमंत्री होते. चंद्रिका राय ते सारण जिल्ह्यातील पारसा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.

दरोगा बिहारचे १० वे मुख्यमंत्री होते. १६ फेब्रुवारी १९७० ते २२ डिसेंबर १९७० पर्यंत त्यांनी बिहारचे मुख्यमंत्रीपद भूषवले. चंद्रिका यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. सध्या त्याचे कुटुंब दिल्लीमध्ये राहते. ऐश्वर्याने तिचे शालेय शिक्षण पाटण्यातून तर पदवी दिल्लीतून घेतली आहे. तेज प्रताप आमदार असून त्यांनी नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषवले आहे.