करोना प्रतिबंधासाठी वापरण्यात येणारे पीपीई संच व इतर साहित्यामुळे एकदा वापराच्या प्लास्टिकचा वापर वाढला असून पंतप्रधान मोदी यांनी गेल्या  स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून एकदा वापराच्या (यूज अँड थ्रो)  प्लास्टिकविरोधात जनचळवळ उभारण्याचे आवाहन केले होते, पण आता प्लास्टिकचे प्रदूषण करोना प्रतिबंधक साधनांमुळे हजारो पटींनी वाढले असून प्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न निर्माण झाला आहे,  असे पर्यावरण तज्ञ व राजकीय नेते अनुप नौटियाल यांनी म्हटले आहे.

टाळेबंदीमुळे पर्यावरणावर काही चांगले परिणाम झाले. हवेतील प्रदूषकांचे प्रमाण घटले, नद्यांचे पाणी स्वच्छ झाले पण करोनामुळे मास्क, ग्लोव्हज, फेस शील्ड, पीपीई संच, सॅनिटायझर बाटल्या यांच्या माध्यमातून प्लास्टिक प्रदूषणाचा भस्मासूर उभा राहिला आहे. एकदा वापराच्या प्लास्टिकविरोधात जे प्रयत्न सुरू झाले होते त्याला धक्का  बसला आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, पंतप्रधानांनी एकदा वापराच्या प्लास्टिकवर बंदीचे आवाहन केल्यानंतर देशात प्लास्टिक प्रदूषणाविरोधात वातावरण तयार झाले होते. ‘स्वच्छता ही सेवा’ चळवळच त्यामुळे सुरू झाली होती. त्यावेळी डेहराडूनमध्ये एक लाख लोकांनी मानवी साखळी तयार केली होती. करोनामुळे मास्क, ग्लोव्हज, फेस शिल्ड, पीपीई संच यांचा सक्तीचा वापर सुरू झाल्याने प्रदूषण खूपच वाढले आहे. उत्तराखंडमध्ये रोज ५५०० किलो जैव वैद्यकीय कचरा तयार होत असून येथे तीन हजार रुग्णालये आहेत. राज्यातील करोना कचऱ्याची विल्हेवाट केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषानुसार करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.