उत्तर प्रदेशमध्ये गेल्या २४ तासांत आणखी ४६ जणांना करोनाची लागण झाल्याचे आढळल्याने राज्यातील करोनाबाधितांची संख्या १७२ वर पोहोचली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दिल्लीतील ताबलिगी जमातला हजर असलेल्यांपैकी ३६हून अधिक जणांचे नमुने गोळा करण्यात आले होते ते पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आल्याने करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हरयाणामध्ये करोनाची लागण झालेल्यांची संख्या शुक्रवारी ४३ वर पोहोचली आहे, नूह आणि गुरुग्राम जिल्ह्य़ांमध्ये करोनाची लागण झालेले नवे रुग्ण आढळले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लागण झालेले तीन जण केरळचे आहेत तर गुरुग्राममध्ये दोन जणांला लागण झाल्याचे आढळले असून ते महाराष्ट्रातील आहेत, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर गुरुग्राममध्ये आणखी एकाला करोनाची लागण झाली असून तो उत्तर प्रदेशातील आहे. हरयाणात एकूण ४३ जणांना करोनाची लागण झाली आहे त्यापैकी १३ जणांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे.

आंध्रात पहिला बळी

अमरावती (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशातील करोनाचा पहिला बळी हा विजयवाडा रुग्णालयात गेला असून तेथे ५५ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याला करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. राज्यातील हा पहिला  बळी असून एकूण १६१ रुग्ण आहेत. त्यातील तीन बरे झाले आहेत.  नवी दिल्लीत तबलिगीच्या कार्यक्रमास उपस्थित राहून परत आलेल्या स्वत:च्या मुलाकडून या व्यक्तीला लागण झाली होती. या व्यक्तीस ३० मार्चला तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. त्याला अतिरक्तदाब व हृदयाचे आजारही होते. समन्वय अधिकारी श्रीकांत यांनी सांगितले की, रुग्णाच्या करोना निश्चितीस विलंब झाला आहे. या व्यक्तीच्या मुलाची करोना चाचणी ३१ मार्च रोजी पॉझिटिव्ह आली असून त्याला विलगीकरणात ठेवले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या इतर २९ जणांचा शोध घेण्यात आला असून उपमुख्यमंत्री ए. के. के. श्रीनिवास यांनी सांगितले की, १६१  रुग्ण असून त्यातील १४० दिल्लीतील तबलिगीच्या कार्यक्रमाशी संबंधित आहेत. कार्यक्रमास गेलेल्या ८८१ जणांचे नमुने तपासले असून १०८ पॉझिटिव्ह आले आहेत. ६५ जणांचे निकाल बाकी आहेत. या लोकांच्या संपर्कातील ३२ जणांच्या चाचण्या सकारात्मक आल्या आहेत.