पाटणा : बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसमध्ये समझोता झाला आहे. राजद २० तर काँग्रेस नऊ जागा लढविणार आहे. शरद यादव हे राजदच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.

बिहारमध्ये महागठबंधन अर्थात प्रादेशिक पक्षांची महाआघाडी स्थापन झाली असून त्यात राजद आणि काँग्रेससह अन्य स्थानिक पक्ष सहभागी झाले आहेत. या जागावाटपानुसार महाआघाडीतील उपेंद्र कुशवाह यांची राष्ट्रीय लोकसमता पार्टी पाच जागांवर, जीतन राम माँझी यांची हिंदुस्तान अवाम मोर्चा तसेच मुकेश साहनी यांची विकासशील इन्सान पार्टी प्रत्येकी तीन जागांवर लढणार आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे एकेकाळी निमंत्रक असलेले शरद यादव यांनी लोकतांत्रिक जनता दल स्थापन केला आहे. ते आता राजदच्या चिन्हावर निवडणूक लढणार असून निवडणुकीनंतर आपला पक्ष राजदमध्ये विलीन केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

महाआघाडीची घोषणा झाली त्या पत्रकार परिषदेस सर्व पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते, मात्र राजदचे तेजस्वी यादव, लोकसमता पक्षाचे उपेंद्र कुशवाह, हिंदुस्तान अवाम मोर्चाचे माँझी आणि स्वत: शरद यादव गैरहजर होते.  या जागावाटपात काँग्रेसची औरंगाबादची जागा घटकपक्षांना दिली गेल्याने माजी खासदार निखिल कुमार यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली.