महाराष्ट्र सरकारचे केंद्र सरकारला पत्र
आता कांद्याचे भाव गडगडले
काही दिवसांपूर्वी कांद्याचे भाव वाढलेले होते, पण आता ते गडगडले असून घाऊक दर किलोला दहा रूपयांपेक्षा कमी झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने कांद्याचे किमान निर्यात दर रद्द करून निर्यातीला प्रोत्साहन देण्याची मागणी केली आहे.
ऑगस्टमध्ये सरकारने कांद्याचे किमान निर्यात दर टनाला ४२५ डॉलरवरून ७०० अमेरिकी डॉलर केले होते, कारण त्यावेळी घाऊक व किरकोळ बाजारपेठेत कांद्याचे भाव वाढले होते. त्यावेळी कांद्याचा पुरवठा अपुरा होता शिवाय पावसाने नुकसानही झाले होते. किमान निर्यात दराच्याखाली कुठलीही निर्यात करता येत नाही. त्यामुळे निर्यात किंमत वाढवली की देशातील पुरवठा वाढत असतो. केंद्रीय कृषी मंत्र्यांना राज्य सरकारने पत्र पाठवले असून त्यात किमान निर्यात किंमत किंवा दर रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आवाहन केले आहे. भारतातून मे-ऑगस्ट दरम्यान ४५९०९७ टन कांदा निर्यात करण्यात आला. सप्टेंबरच्यापुढे कांद्याची निर्यात झाली नाही कारण निर्यात दर वाढवण्यात आले होते. १५ नोव्हेंबरपासून कांद्याचे दर घसरण्यास सुरूवात झाली, कारण नवीन कांदा आला. गेल्या वर्षीपेक्षा कमी कांदा आला असूनही कांद्याचे दर कोसळले आहेत, असे नाशिकच्या एनएचआरडीएफ (नॅशनल हॉर्टिकल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन) या संस्थेने म्हटले आहे. लासलगाव येथे कांद्याची आशियातील मोठी बाजारपेठ असून तेथे कांद्याचे भाव किलोला १०-१४ रूपये इतके झाले आहेत.