पुढील दोन महिन्यांत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ाच्या काही भागांत सरासरीपेक्षा अधिक, उत्तर महाराष्ट्रातील काही भागात सरासरीइतका, विदर्भात काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र असं असतानाच दुसरीकडे मध्य प्रदेश आणि आजूबाजूच्या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ठाणे आणि पालघरमध्ये मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय हवामान खात्याचे उप महासंचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार मध्य प्रदेश आणि आजूबाजूच्या परिसरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, असं होसाळीकर यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये पुढील काही तासांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असं म्हटलं आहे.

पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व राजस्थानमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. चार जुलैपासून या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

एल-निनो स्थिती..

’प्रशांत महासागरात सर्वसाधारण असलेली एल निनो स्थिती मोसमी पावसाच्या अखेपर्यंत कायम राहणार आहे. प्रशांत महासागरातील स्थितीसह बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा पावसावर परिणाम होतो. ’सध्या हिंदी महासागरातील आयओडी (इंडियन ओशन डायपोल) स्थिती नकारात्मक असून मोसमी पावसाच्या उत्तरार्धातही ती कायम राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे.

ऑगस्टमध्येही जुलैसारखीच परिस्थिती राहणार…

देशभरातील काही राज्यांमध्ये जुलैमध्ये अतिवृष्टी झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती, दरड कोसळण्याच्याही घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मोसमी पावसाचा दुसऱ्या टप्प्यातील अंदाज सोमवारी जाहीर केला. त्यानुसार ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये देशभरात पावसाची स्थिती सर्वसाधारण राहण्याची शक्यता आहे.

राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज

राज्याचा विचार करता ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ाच्या काही भागांत सरासरीपेक्षा अधिक, उत्तर महाराष्ट्रातील काही भागात सरासरीइतका, विदर्भात काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर ऑगस्टमध्ये कोकण आणि विदर्भातील काही भागांत सरासरीपेक्षा जास्त, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

इतिहासावरून..

१९६१ ते २०१० या कालावधीतील आकडेवारीनुसार ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये देशात ४२८.३ मिलिमीटर पावसाची नोंद आहे. त्यामुळे या कालावधीत सरासरीच्या ९५ ते १०५ टक्के  पाऊस पडण्याचा अंदाज आहे. देशाच्या वायव्य, पूर्व आणि ईशान्येत सरासरीइतका ते सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. तर ऑगस्टमध्ये ९४ ते १०५ टक्के  पावसाचा अंदाज आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra weather forecast alert rain in thane and palghar scsg
First published on: 03-08-2021 at 13:57 IST