अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत अखेर तृणमूल काँग्रेसने बाजी मारली. संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरून प्रतिष्ठा पणाला लावलेल्या भाजपाचा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँगेसने अक्षरशा धुव्वा उडवला. अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज खोटा ठरवत तृणमूलने भाजपाला दोन आकड्यांतच रोखून तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. त्यानंतर आता ५ मे रोजी ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
तर, सर्व आमदारांची शपथविधी ६ मे रोजी होणार आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक पार पडली, यामध्ये हा निर्णय झाला आहे. तर, शपथविधी प्रसंगी कोणताही मोठा समारोह होणार नाही, राज्यापाल व सर्व आमदारांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडणार आहे. याप्रसंगी त्यांच्या मंत्रिमंडळातील काही प्रमुख मंत्री देखील शपथ घेण्याची शक्यता आहे. त्या सर्वांची यादी तयार करण्याचं काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. ममता बॅनर्जी यांची मुख्यमंत्रीपदाची ही तिसरी वेळ असणार आहे. तसेच, ममता बॅनर्जींनी सर्व आमदार, नेते व कार्यकर्त्यांना सूचना केली आहे की, कोरनाची गंभीर परिस्थिती असल्याने कोणीही विजयी रॅली काढू नका, जल्लोष करू नका असं ममता बॅनर्जींनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.
Mamata Banerjee to take oath as Chief Minister on 5th May: West Bengal Minister and senior TMC leader Partha Chatterjee pic.twitter.com/KzWVXzbu0d
— ANI (@ANI) May 3, 2021
सगळे पत्रकारही करोना योद्धा; ममता दीदींनी केलं जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ या राज्यांसह पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुका आणि देशातील पोटनिवडणुकांची मतमोजणी रविवारी झाली. करोना प्रतिबंधक नियमांच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून संथगतीने मतमोजणी सुरू होती. तब्बल आठ टप्प्यांत मतदान पार पाडलेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आदींच्या झंझावाती प्रचाराचे केंद्र ठरलेल्या बंगालच्या निकालाबाबत सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. बंगालमध्ये भाजपा तृणमूल काँगे्रसला कडवी लढत देईल, असा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांनीही वर्तवला होता. मात्र, मतमोजणी सुरू होताच हा अंदाज खोटा ठरवत तृणमूल काँगे्रसने मारलेली मुसंडी अखेरपर्यंत कायम राखली.