13 July 2020

News Flash

मराठी जगत : रेखा गणेश दिघे

दिल्ली महाराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था गेली चार दशके बृहन्महाराष्ट्रातील संस्थांसाठी मराठी नाटय़ स्पर्धाचे आयोजन करीत आहे. यंदा या स्पर्धेचे चाळीसावे वर्ष होते. या वर्षीच्या

| December 9, 2012 02:12 am

दिल्ली महाराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था गेली चार दशके बृहन्महाराष्ट्रातील संस्थांसाठी मराठी नाटय़ स्पर्धाचे आयोजन करीत आहे. यंदा या स्पर्धेचे चाळीसावे वर्ष होते. या वर्षीच्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ अलीकडेच संस्थेच्या ‘महाराष्ट्र रंगायतन’ या प्रेक्षागृहात पार पडला. महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्यमंत्री मा. संजय देवतळे समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. गोव्याचे मुख्यमंत्री मा. मनोहर पर्रिकर, गोव्याचे आमदार व नाटककार विष्णु सूर्या वाघ व सुप्रसिद्ध नाटककार डॉ. रंजन दारव्हेकर विशेष अतिथी होते. गेली पन्नास वर्षे दिल्लीत मराठी संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यात योगदान देणारे महाराष्ट्र परिचय केंद्राचे माजी संचालक रा. मो. हेजीब यांचा याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
गद्य आणि संगीत नाटय़प्रयोग अशा दोन गटांत या स्पर्धेचे विभाजन करण्यात आले होते. गद्य नाटय़स्पर्धेत गोव्याच्या कलाऊँ संस्थेच्या ‘इला’ या नाटय़प्रयोगास पहिले तर ‘प्राचीवरी ये भास्कर’ या रंगधारा मडगावच्या नाटकास दुसरे आणि महाराष्ट्र समाज देवास तर्फे सादर करण्यात आलेल्या ‘हसवाफसवी’ या नाटय़प्रयोगास तिसरे पारितोषिक देण्यात आले.
संगीत नाटय़स्पर्धेत गोव्याच्या वाईकदेव भोलानाथ संस्थेच्या ‘संत मीराबाई’ अष्टंगधा गोवातर्फे सादर करण्यात आलेल्या ‘ययाती आणि देवयानी’ आणि भूषण सांस्कृतिक संघ गोवातर्फे सादर केलेल्या ‘संगीत रवी तेज’ या नाटय़प्रयोगांना अनुक्रमे पहिले, दुसरे आणि तिसरे बक्षीस देण्यात आले. याशिवाय वैयक्तिक नैपुण्याबद्दल अनेक पारितोषिके प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वितरित करण्यात आली. अविनाश केतकर, राजेंद्र जहागीरदार, चारुशीला मुधोळकर या गद्य नाटय़स्पर्धेचे परीक्षक होते तर उषा भट, सुप्रिया मालेगावकर व डॉ. पंकज सदाफळ यांनी संगीत नाटय़स्पर्धेचे परीक्षण केले.
सतत चाळीस वर्षे ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल देवतळे यांनी संस्थेचे अभिनंदन केले. या उपक्रमास महाराष्ट्र शासनातर्फे अधिक भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनीही गोव्याच्या नाटय़संस्था या स्पर्धेत मोठय़ा संख्येने भाग घेत असल्याने त्या नाटय़संस्थांना तसेच स्पर्धेचे आयोजन करीत असलेल्या संस्थेस वाढीव अनुदान देण्याचा विचार करू असे सांगितले. ब्रिगेडिअर सुहास कुलकर्णी व श्रीमती श्रृती सदाफळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

बडोद्यात रंगावली चित्र प्रदर्शन
(मुकुंद घाणेकर)
दीपावलीच्या शुभपर्वाचे औचित्य साधून ‘स्वस्तिक रंगोली कलाकार ग्रुप’ या आंतरराष्ट्रीय कलाकार ग्रुपने बडोदे येथील राजवी घराण्याच्या प्रशस्त वास्तूत, भव्य रंगावली चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले होते. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन कॉनमॅट कंपनीचे चेअरमन प्रेमचंद कश्यप यांच्या हस्ते झाले. अनेक प्रथितयश कलाकारांनी आपल्याकडे असलेली गुणवत्ता, हस्तकलाकौशल्य पणास लावून वैविध्यपूर्ण रांगोळी चित्रे नुसती रेखाटली नाहीत तर ती बोलकी केली म्हणूनच ती असंख्य रसिक प्रेक्षकांना अतिशय भावली. तशी दाद त्यांनी तेथे ठेवलेल्या अभिप्राय नोंदवहीतून व्यक्त केली. अशा प्रकारे बडोद्यात विविध ठिकाणी रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ‘परंपरा’ समूहाने सदाशिव फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण कलाकारांना संधी मिळावी या हेतूने प्रदर्शनाचे आयोजन केले. त्यांनी मॉजलपूर येथील श्रेयस विद्यालयात प्रदर्शन भरविले. अल्पना समूहाने आकृती गॅलरीत तसेच अन्य समूहांनी बदामडी बागेतील आर्ट गॅलरीत आयोजन केले.

व्यापारी शैक्षणिक प्रतिष्ठानचा उपक्रम
(सत्येंद्र माईणकर)
कै. एस. एन. व्यापारी शैक्षणिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या वैचारिक भाष्य मालिकेतील ९वे वैचारिक भाष्य हैदराबाद येथील विवेक वर्धिनी शिक्षण संस्थेच्या सेमिनार सभागृहात अलीकडेच प्रस्तुत केले गेले. या वेळी ज्येष्ठ विचारवंत व शिक्षणतज्ज्ञ प्रो. डॉ. चंद्रकांत कोकाटे यांनी आपले विचार स्पष्टपणे मांडले. डॉ. कोकाटे हे बेळगाव येथील के.एल.ई. विद्यापीठाचे कुलगुरूआहेत. त्यांनी ‘भारतातील उच्च शिक्षणाचे स्थान सध्याचे व भविष्यातील यांचे परीक्षण व पुढील समस्या’ या विषयावर विचार व्यक्त केले. त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या विविध आयोगांची नावे सांगितली. देशातील व विदेशी विद्यापीठांविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. चांगल्या शिक्षकांचा अभाव असल्याची खंत व्यक्त करीत शिक्षकांनी आपले शिकविण्याचे कर्तव्य समर्पकवृत्तीने बजावावे, असा इशाराही त्यांनी दिला. उच्च शिक्षणाचे धोरण येणाऱ्या प्रत्येक नवीन शिक्षणमंत्र्यांच्या विचारांनुसार बदलत गेल्याची सलही त्यांनी बोलून दाखविली. तांत्रिक शिक्षणाची महाविद्यालये सुरू करताना देशाला हव्या असलेल्या गरजांची तपासणी झाली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पकपणे आणि समाधानकारक उत्तरे दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. सुशिला व्यापारी यांनी पाहुण्यांचा पारंपारिकरीत्या सत्कार केला.        प्रा. किशोर व्यापारी यांनी डॉ. कोकाटे यांचा परिचय करून दिला. सहभोजनाच्या कार्यक्रमाने सोहळ्याची सांगता झाली.

‘सिंहावलोकन बडोद्याचे’
(विपीन प्रधान)
प्रो. माणिकरावांच्या जुम्मादादा व्यायाम मंदिरात जुन्या काळातील बडोदे कसे होते याची झलक बडोदेकर रसिकांना पाहावयास मिळाली. श्रीमंत सयाजीराव महाराजांच्या १५०व्या जन्म जयंती वर्षांचे निमित्ताने चंद्रशेखर पाटील यांच्या अविश्रांत श्रमातून साकार झालेल्या ‘जुने बडोदा प्रदर्शना’चे उद्घाटन समरजीतसिंह गायकवाड यांच्या हस्ते झाले. सयाजीराव महाराजांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या उमा सभागृहातच हे प्रदर्शन साकार झाले आहे हा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2012 2:12 am

Web Title: marathi world 3
Next Stories
1 येडियुरप्पा समर्थक मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी
2 कावेरी निरीक्षण समितीची शिफारस फेटाळण्याची मागणी
3 एफडीआय विधेयक मंजुरीचे अमेरिकेत स्वागत
Just Now!
X