निर्भया बलात्कारप्रकरणातील चारही दोषींना येत्या १ फेब्रुवारी रोजी फाशीची शिक्षा होणार आहे. दरम्यान, आज या दोषींपैकी विनय शर्मा याने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली आहे. शर्माचे वकील एस. पी. सिंह यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या दोषींची फाशीची शिक्षा लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, आजच (बुधवार) सुप्रीम कोर्टाने चार पैकी एक दोषी असलेल्या मुकेश कुमार सिंह याच्या याचिकेचा फेरविचार किंवा त्यावर कोणताही निर्णय देण्यास नकार दिला आहे. कोर्टाने म्हटले की, “राष्ट्रपतींच्या निर्णयामध्ये दखल देण्याची गरज आम्हाला वाटत नाही.” कोर्टाच्या या निर्णयामुळे मुकेश जवळील बचावाचे सर्व कायदेशीर पर्याय संपले आहेत. त्यामुळे त्याची फाशी निश्चित झाली आहे. यापूर्वी मुकेशच्या वकिलांनी म्हटले होते की, “मुकेशची दया याचिका लवकर फेटाळण्यात आल्याने त्याच्यावर व्यवस्थित लक्ष दिले गेले नाही.” मुकेशची दया याचिका राष्ट्रपतींनी १७ जानेवारी रोजी फेटाळली होती.

सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय देताना म्हटले की, आम्हाला राष्ट्रपतींच्या निर्णयामध्ये कोणतीही घाई-गडबड झाल्याचे वाटत नाही. त्यांनी सर्व कादगदपत्रे तपासूनच आपला निर्णय दिला आहे. तुरुंगात मुकेशसोबत चुकीचे वर्तन झाले हे त्याच्यावर दया दाखवण्याचा आधार होऊ शकत नाही. दया याचिकेवर त्वरीत कारवाई करण्याचा अर्थ असा होत नाही की यावर योग्य प्रकारे निर्णय घेण्यात आलेला नाही, असेही कोर्टाने आपला निर्णय देताना म्हटले आहे.

फाशीची शिक्षा लांबवण्यासाठी दोषींचे रोज नवे पर्याय

निर्भया प्रकरणातील दोषी आपली फाशीची शिक्षा लांबवण्यासाठी रोज नवे पर्याय शोधत आहेत. फाशीपूर्वी तीन दिवस आधी अक्षयकुमार सिंह या एका दोषीने मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुधारित याचिका दाखल केली आहे. मात्र, यापूर्वीच इतर दोषी मुकेश आणि विनय यांच्या सुधारित याचिका कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. अक्षयचे वकील ए. पी. सिंह यांनी सांगितले की, सुधारित याचिकेत आम्ही नव्या तथ्यांचा समावेश केला आहे. त्याच्याच आधारावर आम्हाला सकारात्मक निर्णयाची आशा आहे.