न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या प्रस्तावित भेटीला अवघे ७२ तास उरलेले असतानाच गुरुवारी सकाळी जम्मू-काश्मिरात पोलीस व लष्करावर हल्ला करून या शांतता प्रक्रियेलाच सुरुंग लावण्याचा प्रयत्न अतिरेक्यांनी केला. या हल्ल्यात चार पोलीस व तीन जवानांसह दहा जण ठार झाले. या हल्ल्याची निर्भर्त्सना करतानाच पंतप्रधानांनी मात्र पाकिस्तानबरोबरची चर्चा यापुढेही सुरूच राहील, असे स्पष्ट केले आहे.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून अवघ्या सात कि.मी. अंतरावर असलेल्या कथुआ जिल्ह्य़ातील हिरानगर पोलीस ठाण्यावर तीन दहशतवाद्यांनी गुरुवारी भल्या सकाळी हल्ला चढवला. दहशतवाद्यांनी लष्करी गणवेश परिधान केला होता. तीनही दहशतवाद्यांनी बॉम्बफेक करत पोलीस ठाण्यात अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात पोलीस ठाण्यातील चार जण शहीद झाले. त्यात अतिरिक्त पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश आहे, तर अन्य एक जण जखमी झाला.
पोलीस ठाण्यावरील हल्ल्यानंतर तीनही दहशतवाद्यांनी एका ट्रकवाल्याला ठार करत त्याचा ट्रक पळवला. तेथून त्यांनी जम्मू-पठाणकोट महामार्गावरील सांबा क्षेत्रातील लष्करी छावणीकडे मोर्चा वळवला. तळाजवळच त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू करत जवानांना ठार केले. त्यानंतर तिघेही जवानांच्या खानावळीत पोहोचले. बॉम्बफेक आणि अंदाधुंद गोळीबार यात तीन जवान शहीद झाले, तर तीन जबर जखमी झाले. शहिदांमध्ये लेफ्टनंट कर्नल बिक्रमजीत सिंग यांचा समावेश आहे. जवानांनी तातडीने हल्लेखोरांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. अखेरीस सायंकाळी तीनही दहशतवादी ठार झाल्यावर ही चकमक संपुष्टात आली.
पहाटेच घुसखोरी
हल्लेखोर चार असावेत असा अंदाज होता. मात्र, पोलिसांनी ती शक्यता फेटाळत दहशतवादी तीनच असल्याचे स्पष्ट केले. या तिघांनीही गुरुवारी पहाटेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेकडून घुसखोरी केल्याचा अंदाज आहे.
लष्कर-ए-तोयबाचे काम?
या हल्ल्याची जबाबदारी शोहदा ब्रिगेड या संघटनेने स्वीकारली असली तरी प्रत्यक्षात लष्कर-ए-तोयबाचेच हे खोटे नाव असावे व या हल्ल्यात याच दहशतवादी संघटनेचा हात असावा असा कयास आहे.
घुसखोरीचा डाव उधळला
भारतात घुसखोरी करून दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा पाकिस्तानचा डाव लष्कराने उधळून लावला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील केरण भागातून ३० दहशतवादी भारतात घुसखोरी करू पाहात होते. मात्र, लष्कराने त्यांना अटकाव केला. २४ सप्टेंबरपासून दोन्ही बाजूंत चकमक सुरू आहे. आतापर्यंत डझनभर घुसखोरांचे मृतदेह लष्कराच्या ताब्यात आले आहेत. मात्र, अजूनही चकमक सुरू असून नेमके कितीजण घुसखोरीच्या तयारीत होते हे त्यानंतरच समजू शकेल, असे लष्करातर्फे स्पष्ट करण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Sep 2013 रोजी प्रकाशित
शांततेवर हल्ला ; चार पोलीस व तीन जवानांसह दहा ठार
सैन्याच्या वेशामध्ये आलेल्या अतिरेक्यांनी जम्मुच्या कठुआ आणि सांबा या दोन ठिकाणी हल्ला करून १२ जणांची हत्या केली.

First published on: 27-09-2013 at 01:48 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Militants in army uniform attack police station in jk at least 10 killed