मलेशियन एअरलाइन्सच्या विमानाच्या अवशेषातील १२२ संभाव्य तुकडे उपग्रहांनी पाठवलेल्या नवीन छायाचित्रात दिसत असून मलेशियाचे विमान दक्षिण हिंदूी महासागरात कोसळल्याचे आतापर्यंतचे सर्वात विश्वासार्ह धागेदोरे हाती आले आहेत. असे असले तरी हे तुकडे त्या विमानाचेच आहेत याची खात्री पटलेली नाही.  फ्रान्सने पुरवलेल्या या नवीन प्रतिमा असून दक्षिण हिंदूी महासागरात पर्थपासून २५५७ कि.मी अंतरावर हे १२२ तुकडे सापडले आहेत, अशी माहिती मलेशियाचे वाहतूकमंत्री हिशामुद्दीन हुसेन यांनी सांगितले.
हे पदार्थ तरंगत असून ते १ मीटर ते २३ मीटर आकाराचे आहेत, त्यांची छायाचित्रे आता शोध घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात येत आहेत, असे हिशामुद्दीन यांनी सांगितले. मलेशियन दूरसंवेदन संस्थेला नवीन प्रतिमा फ्रान्सकडून मिळाली आहे. मलेशियाच्या दूरसंवेदन संस्थेने ४०० वर्ग किलोमीटर परिसरातील या छायाचित्रांचा अभ्यास केला व त्यात त्यांना १२२ तुकडे दिसले आहेत, हे तरंगते पदार्थ एमएच ३७० या विमानाचे आहेत की नाहीत हे सांगता येणार नाही. पण ही छायाचित्रे म्हणजे विश्वासार्ह धागेदोरे असल्याचे ते म्हणाले.
 यातील काही तुकडे चमकदार आहेत त्यामुळे ते घन पदार्थाचे असावेत असे ते म्हणाले. आता आमच्याकडे ऑस्ट्रेलिया, चीन, फ्रान्स या देशांनी ढिगाऱ्याबाबत दिलेले उपग्रह छायाचित्रांच्या रूपातील पुरावे आहेत. मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांनी चीनचे उपपरराष्ट्रमंत्री व खास दूत झांग येसुई यांच्याशी चर्चा केली. चीनने शोधाबाबत उपस्थित केलेल्या शंकांवर रझाक यांनी सांगितले, की आम्ही २६ देशांना यात सहभागी करून शोध घेतला. त्यामुळे आम्ही काय केले ते इतिहासच साक्ष देईल. जात, धर्म, वंश, रंग या भेदांच्या पलीकडे जाऊन आम्ही शोध घेतला, असे ते म्हणाले.  दरम्यान ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अ‍ॅबॉट यांनी विमानाचे अवशेष सापडतील असा विश्वास संसदेत व्यक्त केला.
मलेशियाचे विमान पेटले
मलेशियाच्या एका विमानाने  पेट घेतल्याने ते उड्डाणानंतर लगेच सुबांग विमानतळाकडे परतले. सिलँगोर राज्यातील विमानतळावर ही घटना घडली. मालिंदो एअरजेट कंपनीचे विमान मलेशियात पूर्व किनारी भागात क्वाला टेरेंगानू भागाकडे निघाले होते. सकाळी ७.३५ वाजता या विमानाच्या इंजिनाने पेट घेतला. वैमानिकाने लगेच विमान सुबांग विमानतळावर परत आणले. विमानात किती प्रवासी होते हे समजू शकले नाही.