करोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील करोनाग्रस्ताचा वाढता आकडा, स्थलांतरित मजुरांचे होणारे हाल असा अनेक धक्कादायक बातम्या समोर येत असतानाच काही दिलासा देणाऱ्या बातम्याही समोर येत आहेत. अशीच एक बातमी मिझोरममधील गुवहाटीमधून समोर आली आहे. येथील एका व्यक्तीने चार अनोळखी व्यक्तींचे लाखो रुपयांचे कर्ज फेडलं आहे. विशेष म्हणजे हे कर्ज फेडल्यानंतर आपलं नाव कुठेही घेतलं जाऊ नये अशी अट त्याने बँकेला घातली आहे. यासंदर्भातील वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलं आहे.

आइजोल येथील एका उद्योजकाने चार अनोळखी व्यक्तींच्या कर्जाचे लाखो रुपये बँकेत जमा केले आहेत. गरजुंना मदत करण्याच्या उद्देशाने या व्यक्तीने ही मदत केल्याचे सांगितले जात आहे. या व्यक्तीने आइजोल येथील स्टेट बँकेमधून कर्ज घेतलेल्या चार जणांना कर्जमुक्त केलं आहे. या चारपैकी तीन कर्जदार या महिला आहेत. या व्यक्तीने नऊ लाख ९६ हजार ३६५ रुपये जमा केले आहेत. बँकेमधील मोजक्या अधिकाऱ्यांना वगळता कोणालाही ही व्यक्ती कोण आहे हे ठाऊक नाही. अगदी ज्या चार जणांचं कर्ज या व्यक्तीने फेडलं आहे त्यांनाही या व्यक्तीबद्दल कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. “आमच्या ब्रॅचमधील काही जण या व्यक्तीला मागील काही काळापासून ओळखतात. एक दिवस ही व्यक्ती बँकेत आली आणि तिने आपल्याला काही लोकांची मदत करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. या व्यक्तीने बँकेकडून काही गोष्टी तारण ठेऊन कर्ज घेतलेल्या पण ते कर्ज फेडण्यात अडचणी येत असणाऱ्या काही लोकांची यादी देण्याची विनंती केली. त्यापैकीच चार जणांना आपण मदत करु इच्छितो असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आपण १० लाखांपर्यंत मदत करु इच्छितो असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं,” अशी माहिती बँकेच्या सहायक महाव्यवस्थापक शेरिल वॅनहॉंग यांनी दिली.

बँकेने लॉकडाउनच्या काळामध्ये कर्ज फेडण्यास अडचणी येणाऱ्या चार जणांची नावे या व्यक्तीला पाठवली. या सर्वांच्या कर्जाचे ९ लाख ९६ हजार ३६५ रुपये या व्यक्तीने ऑनलाइन बँकिंगच्या माध्यमातून ट्रान्सफर करत या चौघांना कर्जमुक्त केलं. दुसऱ्याच दिवशी बँकेने चारही गिऱ्हाईकांना बँकेत बोलवून घेत त्यांनी तारण ठेवलेल्या जमिनीचे कागदपत्र त्यांना सुपूर्द केले. कागदपत्र हातात पडल्यानंतर या लोकांना घडणाऱ्या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. अखेर बँकेने त्यांना घडलेल्या गोष्टीची माहिती दिली आणि तुम्ही कर्जमुक्त झाल्याचे सांगितल्यानंतर या लोकांकडे या अनोळखी व्यक्तीला धन्यवाद करण्यासाठी शब्द अपुरे पडत होते.

या व्यक्तीने मदत केलेल्यांमध्ये ब्रेम ट्युमरची शस्त्रक्रीया झालेली ५२ वर्षीय महिला, छोट्या उद्योगाला फटका बसलेला एक तरुण उद्योजक या दोघांचाही समावेश आहे. ५२ वर्षीय विधवा महिलेने स्वत:च्या शस्त्रक्रीयेसाठी चार लाखांचे कर्ज घेतले होते. या महिलेला दोन मुली आहे. मागील काही महिन्यापासून कर्जाचे हफ्ते फेडताना या महिलेला अडचणी येत होत्या. तर दुसरीकडे पोलट्री फार्मसाठी एका तरुणाने बँकेकडून अडीच लाखांचे कर्ज घेतले होते. मात्र या तरुणालाही अपेक्षित फायदा न झाल्याने हफ्ते भरण्यात अडचणी येत होत्या. या दोघांनीही बँकेकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम या अनोळखी व्यक्तीने भरली आहे.