पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाला लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणावर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी निशाणा साधला. ते बुधवारी बंगळुरू येथील कार्यक्रमात बोलत होते. पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणासाठी यंदा नागरिकांकडून सूचना मागवल्या होत्या. यामध्ये अनेकांनी त्यांना भाषणाची लांबी कमी करावी, असे सुचवले होते. मोदींनी ही सूचना अंमलात आणत पूर्वीपेक्षा कमी वेळ भाषण केले होते. हाच धागा पकडत राहुल यांनी मोदींना लक्ष्य केले. तीन वर्ष उलटून गेल्यामुळे मोदींकडे आता बोलायला फार काही उरलेले नाही. त्यामुळेच त्यांच्या कालच्या भाषणाची लांबी कमी होती, असा टोला राहुल यांनी लगावला. पंतप्रधान मोदी गेल्या वर्षीच्या ९६ मिनिटांच्या तुलनेत यंदा ते फक्त ५७ मिनिटेच बोलले. २०१४ सालचे त्यांचे पहिले भाषण ६५ मिनिटांचे तर नंतरच्या २०१५ सालचे भाषण ८६ मिनिटांचे होते. मात्र, यंदा त्यांनी केवळ ५७ मिनिटेच भाषण केले.

यावेळी राहुल यांनी भाजप सरकारने सत्तेत येताना दिलेल्या आश्वासनांचा दाखल घेत मोदी सरकारचा समाचार घेतला. भाजपने निवडणुकीपूर्वी देशात प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करू, असे आश्वासन दिले होते. मात्र, सध्या देशातील बेरोजगारीचा दर आठ वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहचला आहे. ही गोष्ट मोदींनी कालच्या भाषणात तुम्हाला सांगितली नाही. भाजपच्या आरोग्य धोरणातील त्रुटींमुळे गोरखपूरमध्ये ९० बालकांचा मृत्यू झाला. राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना भाजपने आरोग्य क्षेत्राच्या निधीत मोठी कपात केली होती. त्यामुळे गोरखपूरमधील रूग्णालय लहान मुलांना ऑक्सिजन पुरवू शकले नाही, असा आरोप राहुल यांनी केला.