मागच्या सहावर्षात सरकारी मालकीच्या ऑर्डीनन्स फॅक्टरी बोर्डाकडून खराब दर्जाच्या दारुगोळयाचा पुरवठा करण्यात आला. त्यावर भारतीय लष्कराचा निधी मोठया प्रमाणात खर्च झाला आहे.  इतक्या पैशात मध्यम पल्ल्याच्या १०० तोफा खरेदी करता आल्या असत्या. संरक्षण मंत्रालयाला पाठवण्यात आलेल्या अंतर्गत अहवालात हा दावा करण्यात आला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

२०१४ ते २०२० दरम्यान ऑर्डीनन्स फॅक्टरी बोर्डाकडून खराब दर्जाचा दारुगोळा पुरवण्यात आला. त्यामुळे ९६० कोटी रुपयांचे नुकसान झाले. “९६० कोटी म्हणजे इतक्या पैशात १५५ एमएम रेंजच्या मध्यम पल्ल्याच्या शंभर तोफा खरेदी करता आल्या असत्या” असे लष्कराच्या नोटमध्ये म्हटले आहे.

OFB चे कामकाज संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागातंर्गत चालते. जगातील ही एक जुनी सरकार नियंत्रित उत्पादन संस्था आहे. देशभरात OFB च्या फॅक्टरी आहेत. भारतीय लष्करासाठी दारुगोळा आणि शस्त्रास्त्र निर्मितीचे काम या कारखान्यांमध्ये चालते. २३ एमएम एअर डिफेन्स शेल, आर्टिलरी शेल्स, १२५ एमएम टँक राऊंड आणि रायफल्समध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या गोळया यामध्ये त्रुटी आढळल्या आहेत.

OFB ने केलेल्या या खराब दर्जाच्या उत्पादनामुळे फक्त आर्थिक नुकसानच झालेले नाही, तर दारुगोळयाच्या सुमार दर्जामुळे जे अपघात झाले, त्यात जिवीतहानी सुद्धा झाल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. “कोणावर जबाबदारी नश्चित करता येत नाही आणि खराब दर्जा यामुळे वारंवार अपघात घडतात. यामुळे सैनिक जखमी होतात, त्यांचा मृत्यू होतो. सरासरी दर आठवडयाला एक अपघात होतो” असे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.