केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला विविध क्षेत्रातील ८९ लोकांना पद्म पुरस्काराची घोषणा केली. परंतु अखेरच्या क्षण जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मुफ्ती मोहम्मद सईद यांचे नाव हटवण्यात आल्याचे सांगण्यात येते. मुफ्ती यांचे कुटुंबीय यासाठी उत्सुक नसल्याचे बोलले जाते. जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच पीडीपी आणि भाजप आघाडी सरकारचे नेतृत्व करणाऱ्या सईद यांचा जानेवारी २०१६ मध्ये मृत्यू झाला होता. सईद यांनी केंद्रीय गृहमंत्री पदही सांभाळले आहे.

पद्म पुरस्कारांच्या नावांची यादी जाहीर करण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी यादीतील अनेकांशी संपर्क साधला होता. सईद यांच्या कुटुंबीयांशी याबाबत संवाद साधला असता त्यांनी यासाठी उत्सुकता दाखवली नव्हती. त्यामुळे त्यांच्या नावाऐवजी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुंदरलाल पटवा (डिसेंबर २०१६ मध्ये त्यांचा मृत्यू झाला) आणि माजी लोकसभा सभापती दिवंगत पी.ए.संगमा यांच्या नावाचा विचार करण्यात आला होता.
सईद यांनी मार्च २०१५ मध्ये दुसऱ्यांदा जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री पद सांभाळले होते. या वेळी त्यांनी पहिल्यांदाच भाजपबरोबर आघाडी केली होती. सईद यांचा मृत्यू ७ जानेवारी २०१६ रोजी नवी दिल्लीतील एम्स रूग्णालयात झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर पीडीपी प्रमुख त्यांची मुलगी महबुबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्री पद सांभाळले.