आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या प्रगती बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्ष २०२२ पर्यंत सर्वांना घर देण्याचा संकल्पाचा पुनरूच्चार केला. बुधावारी झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी महत्त्वकांक्षी योजना ‘आयुष्मान भारत’ आणि ‘सुगम्य भारत’ अभियानाचा आढावा घेतला. याबरोबरच पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांना पाणी बचतीसाठी अधिक प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.

पंतप्रधान मोदींनी आज ३० व्या प्रगती बैठकीत पंतप्रधान आवास योजने (शहरी) शी संबंधीत तक्रारींच्या निवारणांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी २०२२ पर्यंत असे एकही कुंटूंब राहता कामा नये, ज्याच्याकडे स्वतःचे घर नाही, या केंद्र सरकारने केलेल्या त्या संकल्पाचा पुनरूच्चार केला. त्यांनी या उद्दिष्ट प्राप्तीसाठी अधिकाऱ्यांना कामाला गती देण्याचेही आदेश दिले.

यावेळी पंतप्रधान मोदींना आयुष्मान भारत योजनच्या कामकाजाबाबत माहिती देण्यात आली की, या योजने अंतर्गत आतापर्यंत जवळपास ३५ लाख लोकांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, देशभरातील १६ हजार पेक्षा अधिक रूग्णालयं या योजनेशी जुडलेले आहेत. यावेळी मोदींनी सर्व राज्यांना ही योजना अधिक प्रभावीपणे अंमलात आणली जावी असेही सांगितले.