दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या अनेक सभा घेऊन काँग्रेसविरोधात वातावरण तयार करण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या मनसुब्यावर प्रशासनाने पाणी फेरले आहे. रविवारी व सोमवारी मोदींच्या एकूण पाच सभांचे नियोजन प्रदेश भाजपने केले होते. त्यापैकी नवी दिल्ली व पश्चिम दिल्लीत होणाऱ्या सभेची परवानगी सुरक्षेच्या कारणामुळे प्रशासनाने नाकारली आहे.
मोदींची पूर्व दिल्लीतील सीबीडी मैदान व लाल किल्ला परिसरात असलेल्या परेड मैदानावर अशा दोनच सभा येत्या ३० तारखेला होतील तर शेवटची सभा १ डिसेंरला दक्षिणपुरी मध्ये होईल. मोदींच्या सभांना गर्दी जमत असल्याने त्यांच्या एकूण सात सभा घेण्याचा प्रदेश भाजपचा इरादा होता. मोदींनीदेखील त्याला अनुकूलता दर्शवली होती. मात्र त्यानंतर पक्षाने पाच सभा घेण्याचे निश्चित केल़े  मात्र या उर्वरित पाचपैकी दोन सभा रद्द झाल्याने प्रदेश भाजपमध्ये निराशेचे वातावरण आहे. नवी दिल्ली परिसर अत्यंत गजबजलेला असतो. अशा ठिकाणी सुरक्षा व्यवस्था उभी करणे अत्यंत जिकिरीचे काम आहे. शिवाय मोदींची लोकप्रियता पाहता गर्दीचे व्यवस्थापन करणे अवघड असल्याचे प्रशासनाने प्रदेश भाजपला कळवले आहे.