अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. मंगळ ग्रहावर पाठवलेल्या हेलिकॉप्टर इन्जेन्युटीनं यशस्वी उड्डाण केलं. या उड्डाणानंतर नासातील शास्त्रज्ञांनी एकच जल्लोष केला. नासानं या हेलिकॉप्टर उड्डाणाचं लाईव्ह प्रसारण केलं होतं. दूसऱ्या ग्रहाच्या पृष्ठभागावरून उड्डाण करणं आणि नियंत्रित करणं शक्य असल्याचं नासाकडून सांगण्यात आलं आहे.

वजनानं हलक्या असण्याऱ्या या हेलिकॉप्टरकडे जगातील शास्त्रज्ञांचं लक्ष लागून होतं. नासानं या उड्डाणाचं थेट प्रक्षेपण केलं. अनेकांना हे उड्डाण यशस्वी होईल की नाही याबद्दल धाकधूक लागून होती. मात्र हेलिकॉप्टरने उड्डाण घेतलं आणि शास्त्रज्ञांनी सुटकेचा निश्वास सोडला. भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी या हेलिकॉप्टरनं उड्डाणाचं प्रसारण सुरु झालं होतं. १० फूट हवेत फिरल्यानंतर हेलिकॉप्टरनं पुन्हा लँडिंग केलं. ही संपूर्ण घटना अवघ्या ३० सेंकदाची होती.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ही मोहीम फत्ते करण्यात यश आलं. यापूर्वी ११ एप्रिलला हा प्रयोग करण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. मात्र कमांडच्या क्रमाबाबत गोंधळ झाल्याने त्यावेळी उड्डाण टाळण्यात आलं. त्यानंतर नासातील शास्त्रज्ञांनी सॉफ्टवेअरही अपडेट केलं होतं. या उड्डाणानंतर नासातील शास्त्रज्ञांनी एकच जल्लोष केला. मोहीम यशस्वी करण्यासाठी ध्येय आणि चिकाटी हवी असते असंही नमूद केलं.

हेलिकॉप्टरनं यशस्वी उड्डाण घेतल्यानं आता मंगळ मोहिमेतील पैलू उलगडण्यास मदत होणार आहे. मंगळावरील खडबडीत पृष्ठभागामुळे जमिनीवर रोवरला मंगळावरील अभ्यास करणं कठीण होत होतं. त्यामुळे उड्डाण घेऊन दूसऱ्या जागेवर पोहोचून हाय डेफिनेशन फोटो घेणं सोपं होणार आहे. आता मंगळावरील घडण्याऱ्या घडामोडींचा अभ्यास करता येणर आहे.