पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणाऱ्या नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी टीका केली आहे. ‘नवज्योतसिंग सिद्धू हे पाकिस्तानचे नवे एजंट असून ते पाकचे बोलके बाहुले आहेत. त्यांना पाकच्या तालावर नाचू द्या. पाकिस्तानला जाऊन त्यांनी जनतेच्या भावना दुखावल्या. आता राहुल गांधी सिद्धूवर कारवाई करणार का?, असा प्रश्न हरसिमरत कौर बादल यांनी विचारला आहे.

नवज्योतसिंग सिद्धू यांनी करतारपूर मार्ग खुला करण्यासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पहिले पाऊल उचलावे आणि पाकिस्तानशी चर्चा करावी, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री व पंजाबमधील अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर टीका केली. ‘नवज्योतसिंग सिद्धू यांनी शीख समाजाची दिशाभूल केली आहे. पाकिस्तानने करतारपूर कॉरिडोरला हिरवा कंदील देण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. याबाबत भारत सरकारकडे पाकिस्तानने पत्रव्यवहारदेखील केलेला नाही, असा कौर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. बाजवा यांनी करतारपूर कॉरिडोर भारतातील शीख बांधवांसाठी खुला करण्याची तयारी दर्शवल्याने त्यांची गळाभेट घेतल्याचे सिद्धू सांगतात. पण ते दिशाभूल करत आहेत. सिद्धू भारतात आल्यावर त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. आपल्या जवानांची हत्या करणाऱ्या देशाच्या लष्करप्रमुखाची त्यांनी गळाभेट घेतली. यावर माफी मागण्याऐवजी सिद्धू भारतीयांच्या भावनांशी खेळले, असा आरोप कौर यांनी केला.

राहुल गांधीजी तुमच्या पक्षातील एका नेता शत्रूराष्ट्रात गेला, तेथील लष्कर प्रमुखांची गळाभेटही घेऊन आला. जनतेचा विश्वासघात केला आणि शीख बांधवांच्या भावनाही दुखावल्या. तुमचा वरदहस्त असल्याने नेत्याने असे धाडस केले का?, तुम्ही सिद्धूंवर कधी कारवाई करणार, असा सवालही त्यांनी विचारला.

सिद्धू हे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे इतके जवळचे मित्र आहेत की इम्रान खान संपूर्ण संघातून फक्त सिद्धूंनाच तिथे बोलावले, असा टोला देखील त्यांनी लगावला.