मानवी डोळ्याच्या कॉर्नियातील (पारपटल) अद्याप अज्ञात असलेला एक थर प्रा.हरमिंदर दुआ यांच्या नेतृत्वाखालील वैज्ञानिकांच्या गटाने शोधून काढला आहे, या थराला दुआ यांचे नाव देण्यात आले आहे. इंग्लंडमधील नॉटिंगहॅम विद्यापीठातील संशोधकांच्या या नव्या शोधामुळे कॉर्निया ग्राफ्टिंग म्हणजे पारपटलाच्या प्रत्यारोपणात सुधारणा होणार आहे. मानवी डोळ्यातील कॉर्निया हे डोळ्यापुढील संरक्षक भिंग असते त्यातून प्रकाश डोळ्यात प्रवेश करतो. कॉर्निया हा पाच थरांचा बनलेला असतो असे आतापर्यंत मानले जात होते. एपिथेलियम, बोमन्स स्तर, कॉर्नियल स्ट्रोमा, डेसेमेट पटल व कॉर्नियल एंडोथेलियम हे ते पाच थर आहेत. कॉर्नियातील जो नवा स्तर सापडला आहे तो कॉर्नियल स्ट्रोमा व डेसेमेट पटल यांच्या दरम्यान असून त्याची जाडी १५ मायक्रॉन आहे. कॉर्नियाची जाडी ५५० मायक्रॉन म्हणजे ०.५ मि.मी असते. ते अतिशय कठीण असते व एक ते दोन बार इतक्या दाबाला टिकून राहते. दुआ यांनी सांगितले, की या नवीन शोधामुळे नेत्रविज्ञानाची पाठय़पुस्तके पुन्हा लिहावी लागतील. त्याचा परिणाम म्हणून यापुढे कॉर्निया प्रत्यारोपण अधिक सोपे व सुरक्षित होणार आहे. अनेक रोगांची लागण कॉर्नियाच्या मागच्या भागाला दुष्प्रभावित करीत असते त्याचा संबंध या नव्या थराचे अस्तित्व, अभाव किंवा तो फाटलेला असणे याच्याशी लावता येतो. ब्रिस्टॉल व मँचेस्टर येथे संशोधनासाठी दान करण्यात आलेल्या मानवी डोळ्यावर केलेल्या प्रयोगातून कॉर्नियातील या नव्या थराचा शोध लागला आहे.