२०१२ सालच्या निर्भया सामूहिक बलात्कार व खून प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या चौघांविरुद्ध ‘डेथ वॉरंट’ जारी करणाऱ्या सत्र न्यायाधीशांची बदली करण्यात आली आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीश कुमार अरोरा यांची सर्वोच्च न्यायालयात अतिरिक्त निबंधक म्हणून एका वर्षांसाठी प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाच्या महानिबंधकांनी पतियाळा हाऊस न्यायालयातील जिल्हा न्यायाधीशांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. अरोरा यांना तात्काळ मोकळे करावे, असे २० जानेवारीच्या या पत्रात म्हटले आहे. बदली होण्यापूर्वी अरोरा हे निर्भया प्रकरणाची, तसेच दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाने दाखल केलेल्या इतर प्रकरणांची सुनावणी करत होते.

निर्भया प्रकरण आता लवकरच नव्या न्यायाधीशांकडे सुनावणीसाठी सोपवले जाण्याची शक्यता असून, कनिष्ठ न्यायालयांतील निर्भया प्रकरणांशी संबंधित कुठल्याही याचिकेवर विचार करण्याचे काम त्यांच्याकडे राहील.

न्यायालयाने पारित केलेल्या अखेरच्या आदेशानुसार, निर्भया प्रकरणातील विनय शर्मा (२६), अक्षय कुमार सिंह (३१), मुकेश कुमार सिंह (३२) व पवन (२५) या चारही दोषींना १ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता फाशी दिली जाणार आहे.

‘निर्भया’ नावाने उल्लेख करण्यात आलेल्या २३ वर्षांच्या चिकित्सा सहायक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीवर २०१२ साली १६-१७ डिसेंबरदरम्यानच्या रात्री दक्षिण दिल्लीत चालत्या बसमध्ये सहाजणांनी बलात्कार करून व तिच्यावर भीषण अत्याचार करून तिला रस्त्यावर फेकून दिले होते.