बिहार विधानसभा निवडणुकीत २४३ पैकी १२५ जागा जिंकलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) नेते व संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीशकुमार यांनी सोमवारी बिहारचे ३७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मागील दोन दशकात मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची ही त्यांची सातवी वेळ आहे. मात्र भावाच्या या कामगिरीवर त्यांची बहीण मात्र नाराज आहे. नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पद दिल्याच्या निर्णयावर त्यांच्या बहिणीने नाराजी व्यक्त केली आहे. आता आपल्या लहान भावाने देशाचे पंतप्रधान पद भूषवले पाहिजे असं त्यांच्या बहिणीने म्हटलं आहे. भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर नितीश यांच्या बहिणीने भावाच्या दुर्घायुष्यासाठी प्रार्थना तर केलीच शिवाय त्यांनी भावाला देशाच्या पंतप्रधानपदी पहायला आवडेल असं म्हटलं आहे. न्यूज 24 ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ही इच्छा व्यक्त केली.

आता नितीश यांनी मुख्यमंत्री पदाच्या पुढे जात पंतप्रधान पदाबद्दल विचार करायला हवा. त्यांनी पंतप्रधान पद संभाळावे अशी आम्ही देवाकडे प्रार्थना करतो, असं नितीश यांच्या बहीण उषा देवी यांनी म्हटलं आहे. नितीश कुमार यांना एक भाऊ आणि दोन मोठ्या बहिणी आहेत. उषा देवी यांनी नितीश कुमार यांच्या शपथविधीच्या दिवशीच त्यांच्या दिर्घायुष्यासाठी विशेष पुजेचे आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी आपण या पुजेचा प्रसाद घेऊन भावाला भेटायला नक्की जाणार असल्याचे म्हटले. मुख्यमंत्री कार्यालयामधून आमंत्रण आल्यानंतर आपण लगेचच नितीश यांना भेटायला जाऊ असं उषा म्हणाल्या.

 

सोमवारी, राजभवनात दुपारी ४.३० वाजता झालेल्या शपथविधी सोहळ्यात बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांनी नितीशकुमार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. उपमुख्यमंत्री म्हणून भाजप नेते तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी शपथ घेतली. सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, बिहारचे प्रभारी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह रालोआचे राज्यातील सर्व प्रमुख नेते हजर होते.

आणखी वाचा- सातव्यांदा मुख्यमंत्री बनलेल्या नितीश कुमारांवर ‘पीके’चा निशाणा, म्हणाले…

दरम्यान, दोन दिवसापूर्वी रालोआच्या सांसदीय दलाच्या बैठकीत नेतेपदी नितीशकुमार यांची निवड झाली होती. आपल्या पक्षाला कमी जागा मिळाल्याने मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास नितीश यांनी नकार दिला होता. पण करारानुसार नितीश यांनीच हे पद स्वीकारावे, असे भाजपने सांगितले होते. त्यानंतर त्यांनी सत्तास्थापनेचा दावा राज्यपालांकडे केला होता. त्यानुसार आज शपथविधी झाला. भाजपने दोघांना उपमुख्यमंत्री करताना पक्षाचे बिहारमधील नेते सुशील मोदी यांना संधी नाकारली. त्यांच्याऐवजी पक्षातर्फे तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी या दोघांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली. तारकिशोर प्रसाद यांची रविवारी भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते आणि बेतियाहच्या आमदार रेणू देवी यांची उपनेतेपदी निवड झाली होती. त्यांनीही आज शपथ घेतली.  तारकिशोर प्रसाद वैश्य समाजातील आहेत आणि चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. आरएसएसशी संलग्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत प्रसाद यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. रेणू देवी मागासवर्गीयांच्या नोनिया समाजातून येतात आणि चारवेळा बेतिया मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. आज शपथ घेणाऱ्यांमध्ये भाजपचे चार, जदयुचे चार आणि दोन रालोआच्या घटक पक्षाचे सदस्य आहेत.

आणखी वाचा- “पदामुळे कोणी लहान-मोठं होत नाही; सुशीलकुमार मोदी आपण नेता आहात”

नितीश कुमार यांची कसोटी लागणार

नितीश कुमार यांनी याआधी अनेकदा त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत. कधीकाळी ते पंतप्रधान मोदींचे कडवे टीकाकार होते. मात्र त्यांच्या आमदारांची संख्या भाजपपेक्षा अधिक होती. त्यामुळे सरकारवर त्यांचा वचक होता. आता परिस्थिती बदलली आहे. भाजपच्या आमदारांची संख्या वाढल्याने नितीश कुमार यांच्याकडे सरकारचे नेतृत्व राहील, तरीही सरकारवर भाजपचे वर्चस्व असेल. अनेक महत्त्वाची खातीदेखील भाजपकडे जाऊ शकतात. त्यामुळे या सरकारचे नेतृत्व करणं नितीश कुमार यांच्यासाठी आव्हान असेल.