काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्ता आल्यास देशातील प्रत्येक गरीबाला किमान वेतन देऊ केलेली घोषणा हे खोटं आश्वासन असून निवडणूक जुमला असल्याची टीका भाजपाने केली आहे. मात्र काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी भारतीय जनता पक्षाने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. पी चिंदबरम यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ही एक ऐतिहासिक घोषणा असल्याचं म्हटलं आहे.

पी चिदंबरम सध्या 2019 लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा तयार करण्यात व्यस्त आहेत. पक्षाने त्यांच्याकडे जाहीरनामा तयार करणाऱ्या समितीचं नेतृत्व दिलं आहे. पक्ष गेल्या काही काळापासून या विषयावर चर्चा करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. ‘देशातील गरीबाला किमान वेतन मिळालं पाहिजे आणि ती वेळ आली आहे असं आम्हाला वाटतं’, असं पी चिदंबरम यांनी सांगितलं आहे.

यावेळी त्यांना भाजपाने हा निवडणूक जुमला असल्याची टीका केल्याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी हा चुकीचा आरोप असल्याचं म्हटलं. काँग्रेसची सत्ता आल्यास प्रत्येक गरीबाला किमान वेतन देण्याचं पाऊल आम्ही उचलू अशी घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ही मोठी घोषणा केली आहे. आत्तापर्यंत जगातल्या एकाही सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेतलेला नाही असेही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. छत्तीसगढ येथील अटल नगरमध्ये राहुल गांधी बोलत होते.

प्रत्येक गरीबाच्या खात्यात किमान वेतन जमा केले जाईल. ज्याआधारे तो गरीब माणूस आणि त्याचे कुटुंब उपाशी झोपणार नाही असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घोषणा मानली जात आहे.

चिदंबरम यांनी योजनबेद्दल माहिती देताना सांगितलं की, ‘ही योजना युनिव्हर्सल बेसिक इन्कमशी (युबीआय) मिळती जुळती आहे पण सारखी नाही. आम्ही गरीबांची ओळख पटवू आणि त्यांना किमान वेतन देऊ’. त्यांना ही रक्कम थेट खात्यात ट्रान्सफर केली जाणार का असं विचारलं असता सध्या तरी हाच पर्याय आहे, पण जर कोणी यापेक्षा चांगला पर्याय सुचवला तर त्याचा विचार केला जाईल असं सांगितलं.