‘जदयू’चे नितीश कुमार ‘एनडीए’च्या गोटात सामील झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय स्तरावर एकही तुल्यबळ स्पर्धक उरला नसल्याची चर्चा राजकीय जाणकारांमध्ये रंगली आहे. मात्र, कोणाच्याही खिजगणतीतही नसलेला नोएडामधील एक तरूण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचा तगडा प्रतिस्पर्धी ठरण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर पंतप्रधानपदासाठी देखील नरेंद्र मोदी आणि आपल्यात स्पर्धा होईल, असा आश्चर्यकारक दावा त्याने केला आहे.

विनोद पवार असे या तरूणाचे नाव असून, तो ३६ वर्षांचा आहे. अनेकांनी त्याच्या या दाव्याची खिल्ली उडवली असली तरी विनोद आपल्या मतावर ठाम आहे. यासंदर्भात विनोद पवारने म्हटले की, एका ज्योतिषाने २०१९ मध्ये मी पंतप्रधानपदाचा तगडा दावेदार असेन, अशी भविष्यवाणी केली होती. त्यासाठी विनोदने आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. त्याने पंतप्रधान मोदी यांना आव्हान देणारे पोस्टर्सही तयार करून घेतले आहेत.

विनोद हा नोएडाच्या सेक्टर ५० मध्ये कोचिंग क्लासचा व्यवसाय करतो. त्याने यासंदर्भात ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना म्हटले की, देश सध्या गंभीर आर्थिक संकटात आहे. मजुरांच्या किमान वेतनाचा हक्कही डावलला जात आहे. देशाच्या सीमारेषेवर तणावाचे वातावरण आहे. देशासमोरील या सर्व समस्या लवकरात लवकर सोडवण्याची गरज आहे. देशाचा आर्थिक विकास करण्यासाठी व समृद्धी आणण्यासाठी मला पंतप्रधान बनायचे आहे, असे विनोदने सांगितले.

नरेंद्र मोदींना २०१९मधील निवडणुकांमध्ये टक्कर देणारा नेता विरोधकांकडे नाही का?

विनोद पवार यावर्षी झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत नोएडा मतदारसंघातून उभा राहिला होता. मात्र, ऐनवेळी तांत्रिक कारणांमुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याचा उमेदवारी अर्ज बाद ठरवला होता. विशेष म्हणजे उमेदवारी अर्जात विनोदने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आपले मित्र असल्याचे म्हटले होते. तसेच आपल्या उमेदवारी अर्जात प्रस्तावक म्हणून महात्मा गांधी यांच्यासहित स्वातंत्र्य लढ्यातील व्यक्तींची नावे नमूद केली होती. त्यामुळेच निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याचा अर्ज बाद ठरवला होता. माझ्याकडे प्रस्तावक म्हणून स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांची नावे असताना मी स्थानिक लोकांची नावे प्रस्तावक म्हणून का देऊ?, असा सवाल यावेळी विनोदने विचारला होता.

…असं वाटतंय की मी एखादं स्वप्नं पाहतोय; नितीश यांना भेटल्यावर मोदींची प्रतिक्रिया