News Flash

आसामच काय कुठल्याही राज्यात घुसखोरांना स्थान नाही – अमित शाह

काँग्रेसने कायम ईशान्य भारताला वेगळे पाडले असल्याचा आरोप

फोटो सौजन्य: एएनआय

गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी गुवाहाटी येथील ईशान्य लोकशाही आघाडी (नॉर्थ-ईस्ट डेमोक्रेटिक अलायन्स) च्या मेळाव्याप्रसंगी पुन्हा एकदा काँग्रेसवर टीकास्र सोडले. काँग्रेसने कायमच ईशान्य भारताला देशापासून वेगळे पाडले असल्याचा त्यांनी आरोप केला. तसेच, एनआरसीवरून बोलताना केवळ आसामच काय कुठल्याही राज्यात घुसखोरांना स्थान नाही असेही त्यांनी  यावेळी सांगितले.

गृहमंत्री शाह यांनी म्हटले की, प्रत्येक राज्य हा भारताचा अविभाज्य भाग आहे. ही भावना तळागळापर्यंत पोहचवण्यासाठी ईशान्य भारताला काँग्रेसमुक्त बनवणे महत्वाचे होते. आज मी हे आनंदाने सांगू शकतो की ईशान्य भारतातील आठही राज्य ‘एनईडीए’ (नॉर्थ-ईस्ट डेमोक्रेटिक अलायन्स) बरोबर आहेत. काँग्रेसने ईशान्य भारतात कायमच फोडा आणि राज्य करा ही नीती अवंलबवली व संपूर्ण देशापासून ईशान्य भारतास वेगळे पाडले असल्याचा आरोपही गृहमंत्री शाह यांनी यावेळी केला.

स्वातंत्र्यानंतर २०१४ पर्यंत काँग्रेसने ईशान्य भारतात भाषा, जात, संस्कृती, हद्दी या मुद्य्यांवरून भांडणं लावली. यामुळे संपूर्ण ईशान्य भारत कायमच अशांत राहत होता. या ठिकाणी विकास करण्या ऐवजी भ्रष्टाचार केला गेला. येथील दहशतवादाची समस्या सोडवण्या ऐवजी काँग्रेसने त्याला वाढीसाठी पोषक वातारण तयार केले व आपले राज्य कायम राहील यासाठी तेढ निर्माण करा व राज्य करा हे धोरण अवलंबवले असल्याचाही गृहमंत्री शाह यांनी आरोप केला.

‘एनआरसी’च्या मुद्द्यावरून बोलताना गृहमंत्री शाह म्हणाले की, ईशान्य भारतातील राज्यांनी एनआरसीवर चिंता व्यक्त केली आहे. कारण मोठ्याप्रमाणात नागरिक यातून वगळले गेले आहेत व अधिक गांभिर्याने यावर काम झाले पाहिजे असे सांगितले जात आहे. मात्र मी आश्वासन देतो की एकही घुसखोर आसाममध्ये राहणार नाही व अन्य राज्यांमध्येही घुसखोरी करू शकणार नाही. आम्ही केवळ आसामला नाहीतर संपूर्ण देशालाच घुसखोरीपासून मुक्त बनवू इच्छित आहोत. कधी काळी आम्ही असे ऐकून होतो की ईशान्य भारताची ओळख ही दहशतवाद, घुसखोरी, ड्रग्स, भ्रष्टाचार, दंगली अशी होती. मात्र आता या ठिकाणी मागील पाच वर्षात आम्ही विकास, कनेक्टिविटी, मुलभूतसुविधा, क्रीडा व शांतीच्या दिशेने वाटचाल करत आहोत.

यावेळी त्यांनी कलम ३७१ ला केंद्र सरकार धक्का लावणार नसल्याचेही पुन्हा एकदा येथील लोकांना आश्वासन दिले. ते म्हणाले की, कलम ३७० मधील तरतुदी या तात्पुरत्या स्वरूपाच्या होत्या. तर कलम ३७१ ही विशेष तरतूद आहे. हा ईशान्य भारताचा अधिकार आहे याला कोणीही धक्का लावणार नाही.कलम ३७० आणि कलम ३७१ या दोन्हींमध्ये मोठा फरक असल्याचे शाह यांनी नमूद केले. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० हटवल्यानंतर कलम ३७१ बाबतही अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या या पार्श्वभूमीवर गृहमंत्री शाह यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यांनी यावेळी हे देखील म्हटले की, आज सीमेवर जी देशविरोधी कृत्य घडत आहेत, त्याविरोधात केंद्र सरकार कठोर पावलं उचलणार आहे. ड्रग्स, हत्यारांसह मानवी तस्करीविरोधात केंद्र सरकार अधिक कठोर होणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

याचबरोबर ईशान्य भारतातील आठही राज्यांनी ‘एनईडीए’ (नॉर्थ-ईस्ट डेमोक्रेटिक अलायन्स)ला स्वीकरले असल्याचे सांगत गृहमंत्री शाह म्हणाले की, २५ लोकसभांपैकी १९ लोकसभेच्या जागांवर एनईडीएने विजय मिळवला आहे. आम्ही छोट्या-छोट्या पक्षांची भावना लक्षात घेऊन त्यांना एनईडीए (नॉर्थ-ईस्ट डेमोक्रेटिक अलायन्स)शी जोडले आहे. ईशान्य भारत हा देशाच्या फुफ्फसांप्रमाणे आहे कारण या ठिकाणचा २६ टक्के भू भाग हा वन्यभाग आहे. जो देशाला ऑक्सिजन देण्याचे काम करतो, असेही त्यांनी म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2019 3:49 pm

Web Title: not only assam but the whole country will be free from intrusion msr 87
Next Stories
1 वाहनांची विक्री वाढवण्यासाठी सरकार आणणार ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’ – नितीन गडकरी
2 वाहन उद्योगावरील विघ्न कायम; दोन दशकानंतर विक्रीचा नीचांक
3 पंतप्रधान मोदी व इम्रान खान एकाच दिवशी संयुक्त राष्ट्रांना करणार संबोधित
Just Now!
X