रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या ही मुंबई, पुणे किंवा महाराष्ट्रातील इतर शहरांपुरतीच मर्यादित नाही. हैदराबादमधील जनताही या खड्डयांमुळे त्रस्त झाल्याचे दिसते. रस्त्याची डागडुजी व्हावी, खड्डे बुजवावेत म्हणून नेहमी आंदोलने केली जातात. कधी खड्ड्यात झाडे लावली जातात. तर कधी खड्डयांना जलतरण तलावाचे रूप देऊन आंदोलन केले जाते. पण हैदराबादमध्ये एक अनोखे आंदोलन केल्याचे दिसून आले. वारंवार तक्रार करूनही रस्त्यावरील खड्डे बुजवले नाही म्हणून शहरातील नागरिकांनी अनोखी पद्धत अवलंबली. लोकांनी रस्त्यावरील खड्डे स्वत: बुजवले. या सर्व खड्ड्याना महानगरपालिका प्रशासन आणि शहर विकासमंत्र्यांची नावे दिली.

हैदराबादेतील अनेक रस्त्यावरील खड्ड्यांचे ‘केटीआर रामाराव’ असे नामकरण करण्यात आले. काही खड्ड्यांना संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका ट्रम्प यांचे नाव देण्यात आले. या सर्व नावांशी केटीआर हे नाव जोडण्यात आले.

सिकंदराबाद येथील काही लोकांनी काही खड्डे बुजवले आणि या मार्गाचे ‘केटीआर निर्मला सीतारमण मार्ग’ असे नामकरण केले. या रस्त्यांची दुरूस्ती संरक्षणमंत्र्यांचा अथवा इव्हांकाचा दौरा असतो तेव्हाच केली जाते, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.