ऑक्सिजनसाठी देशभरात मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. करोनाच्या रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठ्याअभावी मृत्यू ओढवत असल्याच्याही घटना समोर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे ऑक्सिजन ही मुळातच जिवंत राहण्यासाठी मूलभूत बाब असताना करोनाच्या संकट काळात ऑक्सिजनचं मोल कैक पटींनी वाढलं आहे. या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनचीही चोरी झाली असल्याची घटना समोर आली आहे. आणि थोडा थोडका नसून ऑक्सिजन वाहून नेणारा आख्खा टँकरच गायब झाल्याची घटना समोर आली आहे. हरयाणामध्ये हा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा देखील दाखल करून घेतला आहे.

 

टँकरची चोरी झाली कशी?

पानिपतमध्ये ऑक्सिजनचा एक प्लांट आहे. या प्लांटमधून इतर भागात आणि इतर राज्यांमध्ये देखील ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. पानीपतहून अशाच प्रकारे लिक्विड ऑक्सिजनचा एक टँकर बुधवारी हरयाणातील सिरसा या ठिकाणी जात होता. पण सिरसामध्ये तो पोहोचलाच नाही, अशी तक्रार पानिपत जिल्हा औषध नियंत्रकांनी (District Drug Controller) दिली आहे. पीटीआयनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

आधी लसी पळवल्या, मग “माफ करा, चूक झाली” सांगत चोरानं परत केल्या १७०० लसी!

“बुधवारी प्लांटमधून लिक्विड ऑक्सिजन भरून हा टँकर निघाला. सिरसामध्ये हा पुरवठा जाणार होता. पण हा टँकर नियोजित स्थळी पोहोचलाच नाही. आम्ही या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे”, अशी माहिती पानिपतमधील मतलाऊडाचे स्टेशन हाऊस ऑफिसर मनजीत सिंग यांनी दिली आहे.

दरम्यान, असाच प्रकार दिल्लीमध्ये देखील घडल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी हरयाणाचे मंत्री अनिल विज यांनी केला होता. “पानिपतहून फरीदाबादला कोविड रुग्णांसाठी मेडिकल ऑक्सिजन नेणारा एक टँकर दिल्ली सरकारने त्यांच्या हद्दीत येताच लुटला”, असा आरोप विज यांनी केला होता. गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजन पुरवठ्यावरून हरयाणा सरकार आणि दिल्ली सरकारमधील संबंध ताणले गेले आहेत.