पठाणकोट येथे लष्कर ए तोयबाने केलेल्या हल्ल्याच्या चौकशीसाठी पाकिस्तानचे पथक लवकरच भारतात जात आहे, असे सांगण्यात आले असून पुरावे गोळा करण्याचे काम हे पथक करणार आहे. ताज्या वृत्तानुसार पाकिस्तानने या प्रकरणी नवीन पथक नेमले असून त्यात अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक महंमद ताहीर, पोलिस उपमहासंचालक महंमद अझीम

अर्शद, आयएसआयचे तन्वीर अहमद, लष्करी गुप्तचर खात्याचे लेफ्टनंट कर्नल इरफान मिर्झा, तपास अधिकारी शाहीद तन्वीर यांचा समावेश आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नफीस झकारिया यांनी सांगितले की, विशेष चौकशी पथक पठाणकोट येथील हवाई तळाला भेट देणार आहे, त्याची तारीख मात्र त्यांनी सांगितली नाही.

विशेष चौकशी पथकात नागरी, लष्करी गुप्तचर संस्थांचे तज्ञ असतील व हे चौकशी पथक पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी जानेवारीतील या हल्ल्याच्या चौकशीसाठी स्थापन केले आहे. अंतर्गत सुरक्षा मंत्री चौधरी निसार अली खान यांनी सांगितले की, पुरावे गोळा करण्यासाठी येणाऱ्या पाकिस्तानच्या चौकशी पथकाला भारताने परवानगी दिली आहे. पाकिस्तानने या प्रकरणी प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला असून त्यामुळे हल्ल्यात जे सामील असतील त्यांच्यावर खटला चालवण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

पंजाब पोलिसांनी याबाबत प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला असून त्यात पाकिस्तानच्या जैश ए महंमद या संस्थेचा अतिरेकी मासूद अझर याचा समावेश नाही. दोन देशांच्या परराष्ट्र सचिवांच्या बैठकीबाबत झकारिया यांनी सांगितले की, त्यात कुठलाही अडथळा नाही, पण बैठकीची तारीख अजून ठरलेली नाही.