पुढच्या काही दिवसात पाकिस्तानची अस्वस्थतता आणखी वाढणार आहे. कारण भारताचे लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे आठवडयाभराच्या सयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. भारताचे लष्करप्रमुख प्रथमच पश्चिम आशियाई देशांचा दौरा करत आहेत. लष्करप्रमुख नरवणे यांच्या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील संरक्षण संबंध अधिक बळकट होणार आहेत.

या वर्षातील लष्करप्रमुख नरवणे यांचा हा तिसरा दौरा आहे. याआधी ते ऑक्टोबरमध्ये म्यानमार आणि नोव्हेंबरमध्ये नेपाळ दौऱ्यावर गेले होते. “भारताचे लष्करप्रमुख प्रथमच यूएई आणि सौदी अरेबियाचा दौरा करत आहेत. हा दौरा ऐतिहासिक आहे” असे भारतीय लष्कराने म्हटले आहे. नरवणे दोन्ही देशांचे लष्कप्रमुख आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या भेटी घेतील. हा दौरा १४ डिसेंबरला संपेल. नऊ आणि दहा डिसेंबरला ते यूएईमध्ये असतील. भारत-यूएई संरक्षण संबंध अधिक दृढ कसे होतील, त्या दृष्टीने ते वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा करतील.

१३-१४ डिसेंबरला ते सौदी अरेबियामध्ये असतील. संरक्षणाशी संबंधित वेगवेगळया विषयावर ते आपले विचार मांडतील. रॉयल सौदी लँड फोर्सच्या मुख्यालयात नरवणे भेट देतील. किंग अब्दुलाझीझ वॉर कॉलेजमध्येही ते जातील. राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठामध्ये ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. लष्करप्रमुख नरवणे यांचा यूएई, सौदीचा दौरा हा पश्चिम आशियाई देशांबरोबर संबंध बळकट करण्याच्या भारत सरकारच्या रणनितीचा एक भाग आहे. यूएई आणि संयुक्त अरब अमिरातीचे भारताबरोबर संबंध विकसित होत असल्याने पाकिस्तानचा जळफळाट होत आहे. या दोन्ही देशांचे आता पाकिस्तान बरोबर पूर्वीसारखे सख्य राहिलेले नाही. सत्तेवर आल्यापासून मोदी सरकारने आखाती देशांबरोबर संबंध विकसित करण्याला प्राधान्य दिले आहे.