शनिवारी छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यापासून कोब्रा कमांडो दलाचे जवान राकेश्वर सिंह मनहास बेपत्ता आहेत. बेपत्ता कमांडो आपल्या ताब्यात आहे असा दावा नक्षलवाद्यांनी केला आहे. नक्षलवाद्यांनी सोमवारी दोन स्थानिक पत्रकारांना फोन करुन बेपत्ता कमांडो आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला. बिजापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश मिश्रा आणि पत्रकार राजा राठोड यांना फोन करुन नक्षलवाद्यांनी बेपत्ता जवान आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला. त्यानंतर आता बेपत्ता कमांडोच्या निरागस लहान मुलीचा व्हिडिओ समोर आला आहे.
डोळ्यातले अश्रू सावरत माझे वडील लवकर परत यावेत अशी विनंती करताना ती या व्हिडिओमध्ये दिसतेय. व्हिडिओत बेपत्ता जवानाचे अन्य नातलगही दिसत आहेत. छत्तीसगडचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. बंधक असलेल्या जवानच्या मुलीचा आवाज ऐकून मन सुन्न झालं…त्यांच्या कुटुंबाच्या वेदनेची आपण फक्त कल्पनाच करु शकतो…जवानाला सुरक्षित परत आणण्याचे सर्व प्रयत्न सुरू आहेत…तुझे वडील एक शूर योद्धा आहेत. तू देखील त्यांच्याप्रमाणे संयम आणि धैर्य ठेव अशा कॅप्शनसह आयपीएस अधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत बेपत्ता जवानांचे अन्य कुटुंबीयही आपल्या अश्रूंना आवर घालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
आणखी वाचा- छत्तीसगड नक्षलवादी हल्ला, बेपत्ता कोब्रा कमांडोचं नक्षलवाद्यांकडून अपहरण?
#Bijapur #NaxalAttack में बंधक बनाए गए जवान की बेटी की आवाज़ सुनकर मन भावुक हो गया.
परिवार के दर्द की हम सिर्फ कल्पना ही कर सकते हैं…
उनकी सुरक्षित वापसी के लिए हर संभव प्रयास किये जा रहे हैं. आपके पिताजी रक बहादुर योद्धा हैं बिटिया. आप भी उनकी तरह धैर्य और हिम्मत से काम लें… pic.twitter.com/8dwTw5xkj3
— Dipanshu Kabra (@ipskabra) April 5, 2021
याबाबत बोलताना, “हो जवान नक्षलवाद्यांच्या ताब्यात असू शकतो कारण सुरक्षा दलाने घटनेनंतर जवळच्या पाच-सहा किलोमीटरच्या परीसरात त्याचा बराच शोध घेतला होता पण त्यांना यश आलं नाही. जवानाला शोधण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत, आम्ही फोन कॉल्सचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत”, अशी माहिती बिजापूरचे पोलिस अधीक्षक कामलोचन कश्यप यांनी दिली आहे.
आणखी वाचा- ‘नक्षलवाद्यांविरोधातील मोहिमेची आखणीच चुकीची होती’
दरम्यान, छत्तीसगड जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरोधातील मोहीम चुकीच्या पद्धतीने व अकार्यक्षमपणे आखली होती, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. नक्षलवाद विरोधी मोहिमेवेळी सुरक्षा दलांचे २२ जवान मारले गेले, त्यावर गांधी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, “नक्षलवाद विरोधी मोहिमेची चुकीची व अकार्यक्षम आखणी यामुळे आमचे २२ जवान बळी गेले आहेत. आमचे जवान जर अशा पद्धतीने बळी जाणार असतील तर प्रत्येक भारतीय जवानाला चिलखती संरक्षण दिले पाहिजे. आमचे सुरक्षा जवान स्वेच्छेने हुतात्मा होत नाहीत व ते तोफेच्या तोंडी बळी देण्यासाठी नाहीत. एकविसाव्या शतकात कुणाही जवानाला चिलखती संरक्षणाशिवाय शत्रूशी लढण्यास पाठवणे चुकीचे आहे. प्रत्येक सैनिकाला चिलखती संरक्षणाची सुविधा दिली पाहिजे”. तर, देशात नक्षलवादाविरोधातील लढाई अधिक तीव्र करण्यात येईल असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवादी हल्ल्यात २२ सुरक्षा जवान हुतात्मा झाल्यानंतर तेथील भेटीत सांगितले.
आणखी वाचा- “मी भारतीयांना आश्वासन देतो की, या हल्ल्यानंतर…”; शाह यांचा नक्षलवाद्यांना इशारा
शनिवारच्या या हल्ल्यात एकूण २२ जवान यात हुतात्मा झाले त्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे आठ जण असून कोब्रा कमांडो दलाचे सात कमांडो तर जिल्हा राखीव दलाचे ८ , विशेष कृती दलाचे ६ जण यांचा समावेश आहे. एक जवान बेपत्ता आहे.