News Flash

देशातील हिंसक घटनांबाबत सोयीची भूमिका नको !

जुना भारत म्हणजे कोणता भारत, असा सवाल करून मोदींनी जुन्या भारताची व्याख्या केली.

पंतप्रधान मोदी यांचा राज्यसभेत विरोधकांना टोला ; झारखंडमधील झुंडबळीचा निषेध

नवी दिल्ली : झारखंडमध्ये झुंडीशाहीने केलेली युवकाची हत्या निंदनीय आहे. अशा घटनेमुळे वेदना होतात. गुन्हेगारांना शिक्षा व्हायलाच हवी. त्यासाठी घटना, कायदे, न्यायप्रक्रिया आहे. पण संपूर्ण राज्याला दोषी मानू नका. हिंसा पश्चिम बंगाल, केरळ या राज्यांमध्येही होत असून तेथील हिंसेकडेही एकच मापदंडाने पाहिले पाहिजे. त्याविरोधात सर्व पक्षांनी एकत्रितपणे लढले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यसभेत केले.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील तासाभराच्या उत्तरात पंतप्रधानांनी मुस्लीम तरुणाच्या हत्येवर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली.

झुंडशाहीमुळे होणाऱ्या हत्या वाढत असल्याचा मुद्दा राज्यसभेत विरोधकांनी उपस्थित केला होता. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या मुद्दय़ावर पंतप्रधानांचे मौन बाळगल्याची टीका केली होती. मुस्लीम तरुणाला ‘जय श्रीराम’ म्हणण्याची सक्ती केली गेली. त्यानंतर त्याला बेदम मारहाणही करण्यात आली होती.

तंत्रज्ञानापासून किती दूर पळणार?

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे ११३ विधानसभा, ४ लोकसभा निवडणुका झाल्या. काँग्रेस विजयी झाला तेव्हा मतदान यंत्रे योग्य ठरली आता मात्र त्यात समस्या दिसत आहेत. पूर्वी निवडणुकीत बोगस मतदान, बुथ कॅप्चरिंगची चर्चा होत होती आता मतदानाच्या टक्केवारीची चर्चा होते, असे सांगत तंत्रज्ञानापासून किती दूर पळणार, अस प्रतिप्रश्न मोदींनी काँग्रेसला केला. देशभर एकत्रित निवडणुका घेण्याबाबत मतभेद असतील, पण चर्चा तरी करा. इतका आडमुठेपणा कशासाठी, असा प्रश्न मोदींनी विचारला.

राज्यसभाही उत्तरदायी

जनता फक्त लोकसभेतील खासदारांचे काम पाहात नाही तर राज्यसभेतही कसे कामकाज होते याबाबतही चाणाक्ष असते. लोकसभा निवडणुकीत राज्यसभाही महत्त्वाची भूमिका निभावते.

राज्यसभेतील बहुमताच्या बळावर विरोधक सातत्याने आडमुठेपणा करत असतात. त्यामुळेच कित्येक विधेयके प्रलंबित आहेत. आता ती पुन्हा लोकसभेत मांडावी लागणार, त्यावर चर्चा होणार. वेळ आणि पैसा दोन्हींचा अपव्यय होत आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल गळा घोटून मारू नका. राज्यसभाही लोकांना उत्तरदायी असल्याचे मत मोदींनी व्यक्त केले.

काँग्रेस हरला म्हणजे देश हरला?

लोकसभा निवडणुकीत भाजपचा झालेला विजय म्हणजे देशाची आणि लोकशाहीची हार झाल्याचा आरडाओरडा काँग्रेस करत आहे, पण वायनाड, रायबरेलीत देश पराभूत झाला का? अमेठीतही पराभव झाला का? काँग्रेस पराभूत झाला म्हणजे देश पराभूत झाला असे का समजता?  देशात लोकशाही आहे, भविष्यातही निवडणुका होणार आहेत हे लक्षात घेऊन काम करा, असा टोला मोदींनी हाणला. काँग्रेस नकारात्मक राजकारण करत आहे. जीएसटी, रोकडरहित आर्थिक व्यवहार प्रत्येक नव्या गोष्टीला काँग्रेस विरोध करत आहे. योगाचीही त्यांनी चेष्टा केली. त्यांच्या या अहंकारी वृत्तीमुळेच मतदारांनी काँग्रेसला झिडकारून भाजपच्या पारडय़ात मते टाकली, असे मोदी म्हणाले.

कोणता भारत हवा?

जुना भारत म्हणजे कोणता भारत, असा सवाल करून मोदींनी जुन्या भारताची व्याख्या केली. मंत्रिमंडळाच्या निर्णयाची प्रत पत्रकार परिषदेत फाडली जाते. नौदलाचा वापर मौजमजेसाठी केला जातो. न थांबणारे घोटाळे होतात. देशाचे तुकडे करू पाहणाऱ्या लोकांना समर्थन दिले जाते. तिकिटासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. पासपोर्टसाठी महिनाभर वाट पाहावी लागते. गॅस कनेक्शनसाठी खासदारांना विनंती करावी लागते असा जुना भारत हवा आहे? आशा-आकांक्षा पूर्ण करणाऱ्या नव्या भारताची जनतेला अपेक्षा आहे, असे म्हणत मोदींनी गुलाम नबी आझाद यांचा ‘जुना भारत’ अव्हेरला!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 3:52 am

Web Title: pm narendra modi condemns jharkhand mob lynching zws 70
Next Stories
1 अमेरिका-चीन व्यापार युद्धात भारताला मोठी संधी
2 ‘एशिया पॅसिफिक’चा भारताला पाठिंबा
3 राजीव सक्सेना यांना दिलेल्या परदेशगमन परवानगीस स्थगिती
Just Now!
X