लोकसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. पण राजकीय पक्षांमध्ये शाब्दिक युद्धाला सुरूवात झाली आहे. सातत्याने हल्लाबोल करणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पंतप्रधान मोदी यांनी निशाणा साधला आहे. ‘जे लोक गरिबांना लुटत होते, त्यांना यंत्रणेतून हटवण्यात आले आहे. आज प्रामाणिक लोकांना चौकीदारवर भरवसा आहे. पण जे लोक भ्रष्ट आहेत. त्यांना मोदींपासून त्रास आहे,’ असा टोला त्यांनी लगावला. कुरूक्षेत्र येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

महाभेसळीत (महाआघाडी) जितके चेहरे आहेत. ते सर्व लोक न्यायालय, सीबीआय आणि मोदींना शिव्या देण्याच्या स्पर्धेत सहभागी झाले असल्याचा आरोप मोदी यांनी केला.

यावेळी मोदी यांनी नायजेरियातून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. तुम्ही लोक येथे अभ्यास दौऱ्यावर आला आहात. याचा मला आनंद आहे. तुम्ही इथे स्वच्छ भारत अभियानाची माहिती घेण्यासाठी आले आहात. भारतात या मोहिमेचे काम अत्यंत कौतुकास्पद आहे. मला आशा आहे की, नायजेरियातही अशा प्रकारच्या अभियानाला नायजेरियातही प्रोत्साहन मिळेल, असे ते यावेळी म्हणाले.

कुरूक्षेत्रमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, युरोपमध्ये एका अशी जागा आहे. जिथे घरांना बाहेरून अत्यंत सुंदर पद्धतीने रंग दिला जातो. हे पाहण्यासाठी जगभरातील विविध भागातून लोक तिथे जातात. मला आशा आहे की, एक दिवस असे चित्र भारतात दिसेल. पर्यटक येथील घरं पाहण्यासाठी येतील, असे ते म्हणाले.